पिंपरी – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. 16) झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. गडकिल्ल्याचे संवर्धन करतांना त्या ठिकाणी सौर ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर आदी उपस्थित होते.
यावेळी कार्ला येथील एकवीरा मंदिराच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी जिल्ह्यातील कामांच्या प्रगतीचा अहवाल दर तीन महिन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा. निवास आणि न्याहरी योजनेअंतर्गत निवास व्यवस्था करण्यासाठी एमटीडीसीला सूचना देण्यात याव्यात, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
दुर्गप्रेमींच्या माहितीसाठी पुरातत्व विभागाने जिल्ह्यातील गडकिल्ले आणि स्मारक तसेच त्यांच्या संवर्धनात नागरिक व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होण्यास मदत व्हावी यादृष्टीने याठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या विकासकामांची माहिती संकेतस्थळावर द्यावी. गडकिल्ल्याचे संवर्धन करतांना त्या ठिकाणी सौर ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करावी. गडकिल्ल्यांच्या ठिकाणी मंदिरांचे पावित्र्य राहील यासाठी व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
आळंदीच्या पाणी प्रश्नांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. तीर्थक्षेत्र आराखडा तयार करताना पाण्याचे स्रोत निर्माण करणे आणि परिसरात जलसंधारणासाठी तरतूद करण्यात यावी. आळंदी-देहू परिसराला लक्षात घेऊन असे प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीला जिल्हा परिषद, महानगरपालिका, आळंदी नगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पोलीस, पुरातत्व विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.