नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते आज 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मोदी नाशिकमधील ओझर विमानतळावर दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं.त्यानंतर पंतप्रधानांचा भव्य रोड शो पार पडला. युवा महोत्सवादम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांवर कौतुकाचा वर्षाव केला.
“प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शांनी पावन भूमीवर आज आपले पंतप्रधान आले आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. बाळासाहेब ठाकरेंसह देशभरातल्या तमाम लोकांचं राम मंदिराचं स्वप्न पंतप्रधानांनी पूर्ण केलं आहे त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो” अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मोदींचे स्वागत केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप आणि मालदीवबाबत देखील भाष्य केलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,”मोदी लक्षद्वीपमध्ये काय गेले, तिकडे मालदीवमध्ये भूकंप आला. त्यामुळे आपल्या देशाकडे वाईट नजरेनं पाहण्याची हिंमत कुणीच करू शकत नाही. हे फक्त आपल्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळेच होत आहे”
शिंदे पुढे म्हणाले,”जगभरात आपल्या देशाचं नाव आदरानं घेतलं जात आहे. अनेक देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष मोदींकडे सन्मानाने पाहतात. कुणी पंतप्रधानांसोबत सेल्फी काढतो, कुणी बॉस म्हणतो, कुणी वाकून नमस्कार करतो” असं म्हणत ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं.