मुंबई – भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक व्हिडीओ काल एका वृत्तवाहिनीने प्रसारित केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या व्हिडिओमध्ये सोमय्या आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत. यामुळेच आता भाजपवर जोरदार टीका होत आहे. राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्यांच्या या कृतीचा एक पेन ड्राईव्हचं सभागृत सादर केला. ज्यामध्ये सुमारे आठ तासांचे व्हिडीओ असल्याचे दानवे यांनी यावेळी सांगितले.
किरीट सोमय्या यांचा वृत्तवाहिनीने दाखवलेला हा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे. पावसाळी अधिवेशनात देखील याचे जोरदार पडसाद पाहायला मिळाले. विरोधकांनी सोमय्या यांच्या व्हिडीओवरून भाजपवर जोरदार टीका केली. अंबादास दानवे यांनी सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे एक पेन ड्राइव्ह सुपूर्त करत सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली.
“अनेक महिलांना राज्यसभा, विधानपरिषद आणि महामंडळात नियुक्त्या देतो, असं सांगून ब्लॅकमेलिंग केलं जात आहे”. असा गंभीर आरोप यावेळी अंबादास दानवे यांनी केला. तसेच आपलं राज्य फुले, शाहू, आंबेडकर, जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि आहिल्याबाई होळकर यांचं आहे. असं असताना सत्ताधारी पक्षातील काही मंडळी या सगळ्या विचाराला छेद देत असल्याच पाहायला मिळत आहे असंही दानवे यावेळी म्हणाले.
दानवे यांनी सभागृहात उपस्थित केलेले मुद्दे
संबंधित भाजपा नेत्याने काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला आहे.
माझ्याकडे आठ तासांचे व्हिडीओज आहेत. मी ते सभापतींना देणार आहे.
हे कृत्य करणारी व्यक्ती महाराष्ट्रद्रोही आहे. विशेषत: मराठी भगिनींना ब्लॅकमेलिंग केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
हे राजकीय दलाल, उपरे या महाराष्ट्रात आले आहेत. मराठी माता भगिनींचा छळ करण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्या व्यक्तीचं नाव मी स्पष्टपणे घेतो, त्याचं नाव किरीट सोमय्या आहे. त्याने काय-काय केलंय, हे संपूर्ण महाराष्ट्राला समजलं आहे.
अशा किरीट सोमय्याला सत्ताधारी पक्ष संरक्षण देणार का? ज्या माता-भगिनींनी टाहो फोडला आहे? त्यावर हे राज्यसरकार काय करणार?
किरीट सोमय्यांच्या त्रासामुळे अनेकांनी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला आहे.
“या प्रकरणात गुन्हा करणारी व्यक्ती कोण आहे, कोणत्या पक्षात आहे, हा विषय महत्त्वाचा नाही. ही प्रवृत्ती महत्त्वाची आहे. म्हणून माझ्याकडे काही व्हिडीओज आले आहेत. काही माता-भगिनींनी अतिशय हिंमत करून हे व्हिडीओ माझ्यापर्यंत पोहोचवले आहेत. त्या भगिनींना मी सलाम करेन असं म्हणत दानवे यांनी सोमय्या यांची केंद्र सरकारने पुरवलेली सुरक्षा देखील काढून घेण्याची मागणी केली.दानवे यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडत नीलम गोऱ्हे यांच्याकडे सोमय्यांचे व्हिडीओ असलेला पेन ड्राइव्ह सुपूर्त केला.