पाणीप्रश्नी नगर महापालिकेस आठ दिवसांचा अल्टिमेटम

 नगर  (प्रतिनिधी) – ऐन उन्हाळ्यात उपनगरातील अनेक भागांत पाणीच मिळत नाही. या संदर्भात नागरीकांनी वारंवार तक्रारी देखील केल्या आहेत. तथापि, त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे ही परिस्थिती सुधारण्यासाठी महापालिकेत आठ दिवसांची मुदत देतो. त्यानंतर महापालिका प्रशासनाला शिवसेना स्टाईल आंदोलनास तोंड द्यावे लागेल, असा इशारा शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी आज महापालिका प्रशासनाला दिला.

उपनगर भागात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राठोड यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्तांची भेट घेतली. माजी महापौर अभिषेक कळमकर, पक्षाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगिराज गाडे, उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे आदी यावेळी उपस्थित होते.

उपनगरात महिन्याभरापासून प्रभाग 1ते 7 या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. तसेच काही नागरिकांच्या नळाला पाण्याचा पुरवठा होत नाही. याची आम्ही शहनिशा केली आहे. गायकवाड कॉलनी, सिव्हील हाड्को, भिस्तबाग, बोल्हेगाव, श्रमिकनगर आदी भागामध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी सोडले जाते, अशी भूमिका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांसमोर मांडली.

मेनलाईन धुवून घेण्याची गरज…!

करोनाच्या काळात मेनलाईन फ्लश धूवून घ्यावे लागेल, अशी मागणी वॉलमन यांनीच केली होती. मात्र, त्याकडे दूर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे देखील सुरळीत पाणीपुरवठा होण्यास अडथळा झाला आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर ही कामे करणे अवघड जाते. त्यामुळे आताच ही कामे तातडीने करुन घेण्याच्या सूचनाही या नेत्यांनी केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.