नगर (प्रतिनिधी) -विळद (ता. नगर) येथील डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व क्रस्ना डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या रुग्णालयात करोना विषाणू तपासणीस मान्यता मिळाली आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रत्ननातून ही परवानगी मिळाली असल्याचे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या मेडिकल विभागाचे उपसंचालक डॉ. अभिजित दिवटे यांनी सांगितले.
आतापर्यंत आठ संशयिताचे स्वॅब टेस्ट (घशातील नमुने) घेतले आहेत. हे नमुने क्रस्ना डायग्नॉस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड (पुणे) येथे चाचणीसाठी पाठवले जातात. क्रस्ना डायग्नॉस्टिक्स प्रयोगशाळेकडे पाठवलेले संबंधित आठ नमुने निगेटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत, अशी माहिती डॉ. दिवटे यांनी दिली.
देशात करोना व्हायरसचा अत्यंत वेगाने फेलाव होत असल्याचं चित्र दिसत आहे. नगर जिल्ह्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा जीवघेण्या विषाणूशी लढण्यासाठी केंद्र व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग प्रशासकीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपापयोजना युद्धपातळीवर राबवित आहे. जिल्ह्यात करोनाची स्थिती पाहता, नागरिकांचे स्वॅब नमुने घेण्यास आणि करोनाबाधित रुग्णांवर उपचार वेळेवर व्हावेत, म्हणूनच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून डॉ. विखे पाटील मेमोरियल रुग्णालय स्थित क्रस्ना डायग्नॉस्टिक्समध्ये कोविड-19चे नमुना संकलन केंद्राची उभारणी करण्यात आली असल्याचे डॉ. दिवटे यांनी सांगितले.
क्रस्ना डायग्नॉस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड (पुणे) ही लॅब आयसीएमआर आणि एनएबीएल मान्यताप्राप्त आहे. या प्रयोगशाळेला कोविड-19 चाचणीची परवानगी सरकारने दिलेली आहे. नगरवासियांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे संस्थेच्या संचालिका पल्लवी जैन म्हणाल्या.
परराज्यातील आणि महाराष्ट्रांतर्गत जिल्ह्यातील अडकलेल्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली असता, या प्रवासादरम्यान हॉस्टस्पॉट झोनमधील किंवा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले करोना विषाणूची पार्श्वभूमी नसणाऱ्या व्यक्तीला करोनासदृश लक्षणे वाटत असतील, तर चाचणी कोठे करावी, असा प्रश्न नगरवासियांना सतत पडत होता. त्यासाठी ही सुविधा अधिक फायद्याची ठरेल. अधिक माहितीसाठी 7429914208 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन खासदार डॉ. विखे पाटील यांनी केले आहे.