सातारा – सातारच्या नियोजित टेक्नॉलॉजी सेंटरला तात्काळ मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले आहे. या सेंटरबाबतचा प्रस्ताव आठ दिवसांत केंद्राकडे पाठवावा, अशी सूचना राणे यांनी जिल्हाधिकार्यांना दिली आहे.
सातारा येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना ना. राणे यांनी सातार्यात टेक्नॉलॉजी सेंटर सुरू करण्याची घोषणा केली होती. राज्यात उभारण्यात येत असलेल्या केंद्राचे हे उपकेंद्र असेल. सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत असून, त्यात अनेक सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग आहेत. उद्योगांना मनुष्यबळ पुरवणार्या अनेक शिक्षण आणि तंत्रशिक्षण संस्था सातार्यात आहेत. त्यामुळे या केंद्रासाठी सातारा हे सुयोग्य ठिकाण ठरेल, अशी भूमिका खासदार उदयनराजे यांनी मांडली होती. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी नवी दिल्ली येथे ना. राणे यांची भेट घेतली.
सातार्यात टेक्नॉलॉजी सेंटर स्थापन केल्यास ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा, विजेवर चालणारी वाहने, कृषी औजारे, कागद निर्मिती आदी उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ तयार होईल. याचा फायदा केवळ सातारा जिल्ह्यालाच नव्हे, तर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच उद्योगांना होईल. त्यामुळे हे सेंटर लवकरात लवकर मंजूर करावे, अशी विनंती उदयनराजे यांनी केली. राणे यांनी तातडीने संबंधित अधिकार्यांना बोलावून सूचना केल्या. जिल्हाधिकार्यांना फोन करून येत्या आठ दिवसांत आपल्या मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांना दिले. प्रस्ताव आल्यानंतर या केंद्राला तातडीने मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन राणे यांनी उदयनराजे यांना दिले.
‘मास’च्या प्रदर्शनाला शुभेच्छा
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा यांच्यावतीने जिल्हा परिषद मैदानावर सुरू असलेल्या औद्योगिक प्रदर्शनास उदयनराजे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. टेक्नॉलॉजी सेंटरबरोबरच सातार्यात ईएसआय रुग्णालय आणि ईपीएफ कार्यालय आणण्यासंदर्भात केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे औद्योगिक विकासास गती मिळेल, असे उदयनराजे यांनी नमूद केले.