जळोची -बारामती शहरासह तालुक्यात “करोना’चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवा, असे आदेश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती येथे पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, मुख्य अभियंता महावितरण, सुनील पावडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील,नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, ग्रामीण रूग्णालय रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तांबे, गट विकास अधिकारी राहूल काळभोर, जिल्हा परिषद पुणे माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, करोनाच्या सर्वच रुग्णांना बेड मिळणे आवश्यक आहे. बारामती येथील कोविड सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने करोनाच्या उपचारासाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करावे, त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. रुग्णांवर तातडीने उपचार करावेत तसेच इतर गंभीर आजारी कोणताही रुग्ण उपचाराशिवाय राहता कामा नये. भविष्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासनाने अधिक दक्ष राहून काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तांबे यांनी सुविधाविषयीची माहिती दिली. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुक्यातील प्रशासनाच्या वतीने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.