दुधाला दरवाढ देण्याची माजी मंत्री शिंदे यांची मागणी
कर्जत (प्रतिनिधी) – राज्यातील तीघाडी सरकारमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे, अशी खरमरीत टीका राज्याचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दूध आंदोलनात केली.
महायुतीच्या वतीने नगर- सोलापूर महामार्गावरील माहिजळगाव येथे आघाडी सरकारच्या विरोधात रस्त्यावर दूध ओतून प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या आंदोलनामध्ये जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, प्रसाद ढोकरीकर, पप्पूशेठ धोदाड, नंदलाल काळदाते, सरपंच प्रकाश कदम, सुनील यादव, संतोष कुरळे, राजेंद्र गायकवाड दीपक काकडे, अशोक शिंदे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्रा. राम शिंदे हे आघाडी सरकारवर टीका करताना म्हणाले, राज्यातील हे आघाडी सरकार नसून तीघाडी सरकार आहे. यांचा कारभार म्हणजे एक नवरा व दोन बायका यांचा अडचणीतील संसार आणि यामध्ये नवरा कोपऱ्यात बसलेला अशी अवस्था झाली आहे. करोनामुळे राज्यातील जनता त्रस्त झाली आहे, या सरकारची कान उघाडणी करण्यासाठी महायुतीच्या वतीने रस्त्यावर दूध ओतून सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे.
दुधाला भाव नाही, विजेचे लोडशेडींग चालू आहे, खतासाठी शेतकरी रांगा लागत आहेत, अशी गंभीर परिस्थिती राज्यात असताना राज्यातील मंत्री मात्र घरात बसून कारभार करीत आहेत आणि केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये दुधाला 25 ते 30 रुपये दर देण्यात आला होता. दूध पावडर अनुदान देण्यात आले होते, शेतकऱ्यांना पाच रुपये थेट अनुदान जाहीर केले होते. या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे, ज्यादा पावसाने काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे, मात्र सरकार डोळे झाकून गप्प बसले आहे. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना महायुतीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निवेदन देण्यात आले. तालुक्याच्या विविध भागात दूध उत्पादकांनी आंदोलने केली.