कृषी विषयक योजना प्रभावीपणे राबवा

राज्यमंत्री विजय शिवतारे यांची अधिकाऱ्यांना सूचना ः खरीप हंगामपूर्व नियोजन सभा

“उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियान राबविणार
यावेळी दि. 25 मे ते 8 जून 2019 या कालावधीत मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विषयक योजनांची गावोगाव जनजागृती व प्रचार व प्रसिद्ध करण्यात येणार असून या मोहिमेचा शुभांरभ बैठकीमध्ये करण्यात आला. यावेळी सर्व तालुका कृषी अधिकारी आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी आभार मानले.

पुणे  – कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. सध्या बियाणे आणि खतांची उपलब्धता असून शेतकऱ्यांच्या वीजजोडणी आणि इतर योजनांकरिता निधीची आवश्‍यकता असल्यास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. या निधीकरिता राज्यस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री यांच्याकडून मंजुरी मिळण्याकरिता प्रयत्न करण्यात येईल, असेही शिवतारे यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामपूर्व 2019 नियोजन सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सामाजिकन्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, आमदार भीमराव तापकीर, बाबुराव पाचर्णे, शरद सोनवणे, शिरूर पंचायत समितीचे सभापती विश्‍वास कोहगडे, बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले व पंचायत समिती सदस्या निर्मलाताई काळोखे, सुवर्णाताई शिंदे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.जी पलघडमल, कृषी अधिकारी सुनील खैरनार, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकात भोर उपस्थित होते.

या बैठकीमध्ये शिवतारे यांनी 2018-19 मधील जिल्ह्यातील खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगाम क्षेत्र व प्रेरणी क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता खरीप हंगाम याची माहिती घेतली. त्या अनुषंगाने सरासरी पावसाची शक्‍यता लक्षात घेता, 2019-20 मधील खरीप हंगामाच्या तयारी माहिती घेतली. त्यामध्ये कर्जवाटपाचे नियोजन, शेती पंपांना वीजपुरवठा, टंचाई नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी विस्तार कार्यक्रम, क्रॉपसॅप प्रकल्प, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना इ. कृषी विषयक योजनांचा आढावा घेतला. तसेच या योजनांची तातडीने प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.