पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कोणत्याही वैद्यकीय माहितीची पत्रके ही माहिती पोहोचवणारी पारंपारिक माध्यमे म्हणून निश्चितच काम करू शकतात. मात्र, चित्रपट, लघुपट यांसारखे दृश्य कलाप्रकार ही वैद्यकीय संवादाची परिणामकारक माध्यमे आहेत, हे आता लक्षात घ्यायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. भविष्यात चित्रपट, लघुपट वैद्यकीय संवादामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
एचआयव्ही या आजाराबद्दल जागृती करण्यासोबतच सार्वजनिक आरोग्याविषयीचा दृष्टिकोन बदलण्याच्या उद्देशाने बनविण्यात आला आहे. आरभाट फिल्म्स प्रस्तुत यु=मी या लघुपटाचे प्रदर्शन विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे नुकतेच झाले. ज्येष्ठ कलाकार आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे आणि भारतीय सार्वजनिक आरोग्य आणि महामारी तज्ज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या वतीने हा लघुपट सादर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, लघुपटाचे दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते उमेश कुलकर्णी, निर्माते डॉ. संजय पुजारी, लेखक डॉ. विवेक बेळे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार श्वेता बसू प्रसाद, अर्जुन राधाकृष्णन, नॅशनल कोएलिशन ऑफ पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही इन इंडिया संस्थेचे सरचिटणीस मनोज परदेशी आणि इतर सर्व कलाकार या वेळी उपस्थित होते.
जागतिक आरोग्य संघटनेचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन, जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी रॉडेरिको ऑफ्रिन यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सहभाग नोंदवला.
समाज म्हणून जगायचे असेल, तर सायन्स अर्थात शास्त्रासोबतच बिहेवियरल सायन्स – वर्तवणूक शास्त्र हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. गोष्ट सांगण्याची भावनिक पद्धत ही जास्त आकर्षक असल्याने तिचा होणारा परिणाम वेगळा असतो. चित्रपटाचे हे माध्यम येथेच उजवे ठरते, असेही माशेलकर यांनी नमूद केले. डॉ. कानिटकर, डॉ. आगाशे, कुलकर्णी आदींचीही भाषणे झाली. डॉ. आगाशे यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले.