राजकारण निवृत्तीची वसंतदादांची घोषणा
सांगली, दि. 13 – महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातील भांडणे संपुष्टात आणण्यासाठी वसंतदादा पाटील यांनी राजकारण संन्यासाची घोषणा आज येथे जाहीर सभेत केली. वसंतदादा पाटील यांचा आज साठावा वाढदिवस त्या अनुषंगाने त्यांच्या सत्कारासाठी आयोजित केलेल्या प्रचंड सभेत ही घोषणा करण्यात आली. इतकी प्रचंड सभा यापूर्वी शहरात झाली नव्हती.
राजीनामा देऊ नका
सांगली – वाढदिवसानिमित्त इंदिरा गांधी यांचा संदेश आला असे सांगून वसंतदादा पाटील म्हणाले की, विधान परिषदेचा राजीनामा न देणे अधिक बरे, असे इंदिराजी मला म्हणाल्या. मी लवकरच दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेईल.
अस्पृश्यतेचे समर्थन करणे शिक्षापात्र गुन्हा ठरणार
नवी दिल्ली – अस्पृश्यता निवारण कायदा अधिक परिणामकारक करण्यासाठी एकोणीस तारखेपासून आणखी काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. अस्पृश्यतेचे समर्थन करणे किंवा अस्पृश्यतेला कोणत्याही कारणासाठी पाठिंबा देणे यापुढे शिक्षापात्र गुन्हा ठरणार आहे. अस्पृश्यता हा दखलपात्र गुन्हा आहे.
परस्पर तडजोडीने तो मिटविता येणार नाही. गुन्हेगारास त्वरित शिक्षा दिली जाईल. ज्या भागात सामुदायिकपणे अस्पृश्यता पाळली जाईल वा अस्पृश्यतेस प्रोत्साहन दिले जाईल, त्या भागावर सामुदायिक दंड बसविण्याचा अधिकार या कायद्यान्चये राज्य सरकारांना देण्यात आला आहे. अस्पृश्यतेच्या गुन्ह्याखाली शिक्षा झालेला इसम लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढविण्यास अपात्र असेल.