दिल्ली वार्ता : बदलता राजकीय प्रवाह

-वंदना बर्वे

सध्या भाजपशासित राज्यात काही वेगळेच वारे वाहू लागल्याचे चित्र दिसत आहे. हा राजकीय प्रवाह जसा बदलतोय तसा मतदारांचा मतप्रवाह बदलत असल्याचे दिसत आहे. आगामी काळातील काही राज्यांतील निवडणुकीत हा बदलता प्रवाह नजरेस पडत आहे.

कट्टर हिंदुत्ववादी होण्याची स्पर्धा 

भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांमध्ये कट्टर हिंदुत्ववादी दिसण्याची स्पर्धा सुरू झाली की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विशेषतः मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यात आघाडीवर दिसून येत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशात लव जिहाद कायदा लागू केला आहे. याच धर्तीवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीसुद्धा वाटचाल करीत आहेत. शिवराजसिंग चौहान यांनीसुद्धा राज्यात लव जिहाद कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

खरं सांगायचं म्हणजे, शिवराजसिंग चौहान हे मवाळ स्वभावाचे समजले जातात. राज्यात “मामाजी’ अशी त्यांची ओळख आहे. लव जिहादचा निर्णय घेतल्यामुळे मध्यप्रदेशातील अल्पसंख्याक समाज आश्‍चर्यचकीत झाला आहे. कारण, भाजपच्या ज्या मुख्यमंत्र्यांसोबत मुस्लीम समुदाय सहजपणे वागतो-बोलतो त्यात चौहान यांचा नंबर लागतो. ईद आणि अन्य सणांच्या वेळेस चौहान यांच्याकडून भेटवस्तू पाठविल्या जातात, हेही सर्वांना माहीत आहे.

लव जिहादचा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील शांतता दहा वर्षांत पहिल्यांदा भंग झाली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी उज्जैन, भोपाळ आणि इंदौरसारख्या शहरातील मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये रॅली काढून अयोध्येतील राम मंदिरासाठी देणगी मिळविण्याचा प्रयत्न केला आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.

राजकारणात असं काय घडलं की, शिवराजसिंग चौहान अचानक कट्टर हिंदुत्ववादी होण्याकडे वाटचाल करू लागले? चौहान राज्यातील निर्विवाद नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, राज्यातील काही महत्त्वाकांक्षी नेत्यांमुळे ते अस्वस्थ झाले असावेत अशी चर्चा आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर, ज्योतिरादित्य शिंदे आणि मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. तोमर आणि शिंदे पंतप्रधानांच्या जवळचे तर आहेच नरोत्तम मिश्रा हेही फिल्डिंग लावत आहेत. अशातच, भाजप हायकमांड शिवराजसिंग चौहान यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.
यासर्व गोष्टींमुळे चौहान यांची झोप उडाली आहे. झोप एवढी उडाली आहे की चौहान यांनी आता स्वतःची बरोबरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांच्याशी करायला सुरुवात केली आहे. शर्मा हे चौहान यांना खूप जुनियर आहेत. परंतु, त्यांची प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी अशी आहे. शिवाय, सरसंघचालक यांचे राज्यात दौरे वाढले आहेत. कदाचित त्यांना प्रभावित करण्यासाठी चौहान यांनी हिंदुत्ववादी होण्याची वाट धरली असावी!

दीदीच्या राज्यात ओवेसींचे पाऊल 

एआयएमआयएमचे नेते ओवेसी यांनाही राष्ट्रीय नेता होण्याचे डोहाळे लागले आहेत. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नशिबाची परीक्षा घेतल्यानंतर त्यांनी ममता दीदींच्या पश्‍चिम बंगालमध्ये धडक मारली आहे. मागच्या आठवड्यात हुगलीतील फुरफर शरीचे पीरजादा अब्बास सिद्दीकी यांची भेट घेऊन ओवेसी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची झोप उडविली.

पश्‍चिम बंगालमध्ये 27 टक्‍के मुस्लीम आहेत. फुरफुर हे त्यांचं श्रद्धास्थान आहे आणि कोलकाताहून फक्‍त 45 किलोमीटर अंतरावर आहे. फुरफुर शरीफचे पीरजादा अब्बास सिद्दीकी यांच्यावर बंगाली मुस्लिमांची खूप श्रद्धा आहे आणि ममता बॅनर्जी यांच्यावर सडाडून टीका करणारे आहेत. ओवेसी आणि सिद्दीकी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील नाही. परंतु, सिद्दीकी यांनी अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत ममता बॅनर्जी यांचा चांगला समाचार घेतला होता. दीदींनी बंगालच्या मुस्लिमांसाठी काहीही केले नाही. उलट, सत्ता मिळविण्यासाठी फक्‍त मुस्लिमांचा वापर केला, असा आरोप त्यांनी लावला होता.

एवढंच नव्हे तर, विधानसभेच्या आगामी निवडणुकीत सिद्दीकी यांनी ओवेसी यांच्या पक्षासोबत आघाडी करण्याचा निर्णयसुद्धा जाहीर करून टाकला. ओवेसी यांच्यामुळे मुस्लीम मतांचे धृवीकरण होण्याची शक्‍यता बळावली आहे. हिंदू मतांचे धृवीकरण झाल्यानंतर दीदी मुस्लीम मतांवर अवलंबून आहे. अशात, मुस्लीम मतांचे विभाजन झाले तर याचा मोठा फटका तृणमूल कॉंग्रेसलाच बसणार आहे. बंगालमध्ये 90 मतदारसंघात मुस्लीम मते निर्णायक आहेत. या मतदारसंघावर झेंडा फडकविल्याशिवाय भाजपला पराभूत करणे फार अवघड आहे. याच कारणामुळे दीदींची झोप उडाली आणि भाजपचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे!

प. बंगाल विधान सभा निवडणुकीच्या निकालावर पुढील राजकीय प्रवाह अवलंबून आहे. जर ममता दीदींनी यावेळीही प. बंगालचा गढ राखला तर पुढे होणाऱ्या अन्य राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीतील वाटचाल भाजपसाठी खडतर ठरणार, मात्र भाजप प. बंगालमध्ये यशस्वी ठरली तर विजयरथ आणखी वेगाने धावू लागेल आणि हा रथ इतर राजकीय पक्षांना थोपवणे आणखी अवघड होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.