62 वर्षांपूर्वी प्रभात : एकाच झाडावर 23 विविध जातींची फळे

ता. 23, माहे फेब्रुवारी, सन 1959

नाग बंडखोरांचा पुनःधुमाकूळ सशस्त्र हल्ल्याचे सत्र सुरू

जोरहट, ता. 22 – येथून 16 मैलांवरच्या नागजंकी चहा मळ्यातील इस्पितळांवर नागबंडखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन स्त्री कामगार ठार व 5 जबर जखमी झाल्याचे समजते. जोरहट भागातील चहामळे व खेड्यापाड्यावर हल्ले करण्याचे सत्र परत नाग बंडखोरांनी चालू केले असून, नाग प्रदेशाचे सरहद्दीवर या सशस्त्र हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. सुमारे चार महिने नागांच्या हालचाली बंद होत्या.

माण तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ; लोकांचे स्थलांतर

फलटण – माण तालुक्‍यातील उत्तर भागात पिण्याच्या पाण्याची विलक्षण टंचाई निर्माण झाल्यामुळे अनेक गावांतील सुमारे तीन हजार लोकांनी पाण्यासाठी फलटण, बारामती, अकलूज भागात स्थलांतर केलेले आहे. सुमारे 500 जनावरेही त्या भागातून हलविण्यात आली आहेत.

पुण्यातील कामगारांची महागाई विरोधी आघाडी

पुणे – येथील नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे शाखा कचेरीत आज पुण्यातील विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महागाईचा (विशेषतः अन्नधान्य) विचार झाला आणि जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव त्वरित कमी करण्यासाठी उपाययोजना व्हावी अशी केंद्र-राज्य सरकारांना विनंती करणारा ठराव करण्यात आला.

एकाच झाडावर 23 विविध जातींची फळे

मॉस्को – सोव्हिएत शेतकी प्रदर्शनात एक विलक्षण प्रकारचे झाड मांडण्यात आले होते. हे झाड सफरचंदाचे होते. पण त्या झाडाच्या निरनिराळ्या फांद्यांना विविध जातीची फळे लागली होती. काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील सोची प्रयोग केंद्रावरही अशाचप्रकारचे एक झाड आहे. अमेरिकन पपनस, स्पॅनिश नारिंग, इटालियन लिंबू, जपानी मोसंबी अशा आंतरराष्ट्रीय फळांचे संमेलनच या एका झाडावर भरलेले दिसून येते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.