– ह.भ.प. गणेश म. भा. फड
हे गुणेंद्रिय धोकोटी। देह धातूंची त्रिकुटी । पांचमेळावा वोखटी। दारूण हे।। हे उघड पांचवेउली। पंचधा आगीं लागली। जीवपंचानना सांपडली। हरिणकुटी हे।। ऐसा असोनि इये शरीरीं। कोण नित्यबुद्धीची सुरी। अनित्यभावाच्या उदरीं। दाटीचिना।। परी इये देहीं असतां। जो नयेचि आपणया घाता। आणि शेखीं पंडुसुता। तेथेंचि मिळे।।
श्री ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात माऊली म्हणतात, हा देह हा वात, पित्त व कफ या तीन धातूंचा समूह आहे. हा देह भयंकर आणि वाईट अशा पंचमहाभूतांचा मेळावा आहे. जीवरूप सिंहाला हा देह हरणांचे घरच सापडले आहे.
याप्रमाणे या देहात जीवरूपी सिंह बद्ध झाला असूनही “मी नित्य, शुद्ध, बद्धमुक्त आहे’ या बुद्धीची नखे या देहाच्या अनित्यत्वाच्या पोटात कोणीच का खुपशीत नाही. अनित्य देहाचे विदारण करून “मी’ नित्य आहे, या विचाराने तो मोकळेपणाचा आनंद भोगण्याकरिता देहाबाहेर का पडत नाही, हे कळत नाही.