विविधा : मधुबाला

-माधव विद्वांस

“सिनेमाची सौंदर्यदेवी’ (Venus Of The Screen) मधुबालाचा आज स्मृतिदिन. पूर्ण नाव मुमताज बेगम जहॉं देहलवी. मधुबालाचा जन्म 14 फेब्रुवारी 1933 रोजी दिल्ली येथे एका अत्यंत गरीब पख्तुनी कुटुंबात झाला. मधुबाला तिच्या आई-वडिलांची 11 अपत्यांपैकी पाचवी कन्या होती. तिचे वडील अयातुल्ला खान हे कामाच्या शोधात दिल्लीहून मुंबईला आले. त्यांच्यासमवेत 9 वर्षांची मुमताज चित्रपटांत काम शोधत होती. त्यावेळी हिमांशु राय यांच्या नजरेस ती पडली. त्यांनी तिला बालकलाकार म्हणून संधी दिली व दरमहा पाचशे रुपयांवर नेमणूक केली.

“बसंत’मध्ये तिने बालकलाकार म्हणून वर्ष 1942 मध्ये पडद्यावर पाऊल ठेवले. पहिली 5 वर्षे तिने बालकलाकार म्हणूनच काम केले व कुटुंबाचा आधारही बनली. वर्ष 1947 मध्ये अवघ्या 14 वर्षांची असताना, केदार शर्मा दिग्दर्शित “नीलकमल’ या चित्रपटात राजकपूरची नायिका म्हणून मधुबालाने काम केले. या चित्रपटामुळे तिच्या सौंदर्याची व अभिनयाची ओळख चित्रपसृष्टीला झाली. नीलकमल, शराबी, मुगल-ए-आजम, बरसात की रात, दो उस्ताद, हावडा ब्रिज, चलती का नाम गाड़ी, फागुन, पारस, अशी तिच्या चित्रपटांची यादी मोठी आहे. केवळ तिच्या अभिनय व सौंदर्यामुळे हे चित्रपट यशस्वी झाले. 1950च्या दशकात काही चित्रपट अयशस्वीही झाले. कारण तिचे वडीलच तिचे व्यवस्थापक होते. कुटुंबाच्या संगोपनासाठी वडील पारख न करता कोणतेही चित्रपट स्वीकारायचे.

वर्ष 1950 मध्ये प्रदर्शित झालेल्या “हंसते आंसू’ या चित्रपटाला बॉलीवूडच्या इतिहासात सेन्सॉर बोर्डाचे पहिले “ए’ सर्टिफिकेट मिळाले होते. अर्थात सीन्स किंवा बोल्ड कंटेंटसाठी नाही तर शीर्षकासाठी आक्षेप घेण्यात आला होता. दिग्दर्शक केबी लाल यांच्या या चित्रपटात मोतीलाल आणि मधुबाला मुख्य भूमिकेत होते.

“महल’च्या यशानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. आपल्या कारकिर्दीत सुमारे 73 चित्रपटांमधून मधुबालाने अभिनय केला. त्या काळातील सुपरस्टार अशोक कुमार, रहमान, दिलीप कुमार, देवानंद इत्यादींबरोबर मधुबालाने काम केले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी मुंबईला भेट देताना अकादमी पुरस्कार विजेता अमेरिकन दिग्दर्शक फ्रॅंक कॅपरा तिला हॉलीवूडमध्ये भूमिका देण्यास उत्सुक होते, परंतु वडिलांनी यास नकार दिला.

“महल’ चित्रपटाच्या वेळी कमाल अमरोहींबरोबर मधुबालाचे नाव जोडले गेले; पण तसे घडले नाही. मात्र दिलीपकुमारबरोबर “मुगल-ए-आजम’चे सेटवर जवळीक वाढत गेली. त्यावेळी तिच्या घरच्यांकडून विरोध झाला. वर्ष 1950 मध्ये मुगल-ए-आजम चित्रपटाच्या वेळी मधुबालास हृदयविकार असल्याचे निदान झाले होते. ही गोष्ट लपविण्याचा प्रयत्न झाला परंतु लपून राहिली नाही. तरीही त्याच अवस्थेत 9 वर्षे तिने अनेक चित्रपटांत काम केले. वर्ष 1956 मध्ये किशोरकुमार बरोबर स्नेह वाढत गेला. वर्ष 1960 मध्ये दोघांचा विवाह झाला. मधुबाला यांना लग्नासाठी अनेक प्रस्ताव आले होते. पण मधुबालाने किशोरकुमार यांची निवड केली. किशोरकुमार यांना तिच्या आजाराची कल्पना असूनही त्यांनी विवाह केला. अखेरची 9 वर्षे अंथरुणावर मृत्यूशी झुंज देत 23 फेब्रुवारी 1969 रोजी मधुबालाने अखेरचा श्‍वास घेतला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.