61 वर्षांपूर्वी प्रभात : तेलसंशोधक रशियन यंत्र “विजय’

ता. 5, माहे एप्रिल, सन 1960

यूनोच्या नकाशातून काश्‍मीरचा प्रदेश भारतात का दाखविला नाही?

नवी दिल्ली, ता. 4 – आज लोकसभेत परराष्ट्रखात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी मि. सादतअली खान यांनी असे सांगितले की, यूनोच्या नकाशातून काश्‍मीरचा प्रदेश भारतीय भूभागांत दाखविलेला नाही म्हणून यूनोतील भारतीय प्रतिनिधीला यूनोकडे तक्रार नोंदविण्यास सांगण्यात आले आहे. यूनोच्या अधिकाऱ्यांनी याबाबत असा खुलासा केला आहे की, काश्‍मीरचा प्रदेश पाकिस्तानच्या हद्दीतही यूनोच्या नकाशात दाखविण्यात आलेला नाही.

काश्‍मीर हा एक वादग्रस्त प्रदेश असाच नकाशात दाखविण्यात आला आहे असे यूनो अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर ए. एम. तरीक यांनी असे विचारले की, जर काश्‍मीरचा हा प्रदेश पाकचा नाही असेच यूनोच्या अनेक ठरावांत म्हटलेले आहे तर तो प्रदेश भारताच्या प्रदेशात आहे असे या नकाशात का दर्शविलेले नाही. यावर खान म्हणाले, तुमची शंका योग्य आहे पण भारत व यूनोचे सचिवालय यांच्यात तोच वादाचा मुद्दा आहे.

येत्या 1 ऑक्‍टोबरपासून दशमान पद्धतीची वजनमापे सक्‍तीची

नवी दिल्ली – दशमान पद्धतीची वजने व मापे विशिष्ट धंद्यांतील व्यवहारांत वापरण्याची सक्‍ती 1 ऑक्‍टोबर 1960 पासून करण्यात येणार आहे. केंद्र सरकारचे व्यापारखात्याचे उपमंत्री सतीशचंद्र यांनी वरील घोषणा करून असे सांगितले की, 1 ऑक्‍टोबर 1960 नंतर जुन्या वजन मापांत व्यवहार करण्यास जादा मुदत देण्यात येणार नाही. गेल्या दोन वर्षात भारतात काही विशिष्ट भागातच नवी वजने मापे जारी झाली आहे.

तेलसंशोधक रशियन यंत्र “विजय’

कॅंबे – येथील तेलखाणी प्रदेशात तेलसंशोधनाखाली भूगर्भात विवर पाडणारे रशियन बनावटीचे प्रचंड यंत्र पाहून व त्याचे कार्य पाहून पंतप्रधान नेहरूंनी त्याचे नाव “विजय’ असे ठेवले. सप्टेंबर 1958 मध्ये कॅंबे या प्रदेशात जेव्हा तेलाचा आढळ झाला तेव्हापासून प्रथमच नेहरूंनी या प्रदेशास ही भेट दिली आहे. यावेळी नेहरूंना रशियन यंत्राची छोटी प्रतिकृती भेट दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.