अबाऊट टर्न : कन्फ्यूजन

– हिमांशू

कोविड आपल्याला नीट समजलेला नाही, या न्यूनगंडानं आम्ही काही दिवसांपूर्वी पछाडलेलो होतो. परंतु आता कोविड कुणालाच कळलेला नाही, असं आमचं मत बनत चाललंय आणि आम्ही एकटेच अज्ञानी नाही, हे वास्तव समजल्यामुळे भीतीच्या छायेतसुद्धा आम्ही काहीसे सुखावलोय. 

एकतर “पुन्हा लॉकडाऊन जाहीर होणार,’ अशी चर्चा सुरू झाल्यापासूनच अनेकांनी बेधडक मतं मांडली. कुठलाही धोका न पत्करता, घरबसल्या “ट्‌विटरवॉर’ खेळली गेली. त्यातून कोण, कुठे “कच्चा’ आहे, यापलीकडे कशाचाच बोध झाला नाही.

एवढंच नव्हे तर कोविडबाबत खरोखर “सीरिअस’ कुणी असावं, असंही दिसलं नाही. ही झाली बड्यांची कथा. ज्यांच्या हातात काहीतरी आहे, ज्यांच्याकडे लोक नेते, मार्गदर्शक म्हणून पाहतात अशांनी मृतांच्या वाढत्या आकड्याबाबत बोलणं टाळून एकमेकांना यथेच्छ झोडपण्याचं धोरण स्वीकारल्यानंतर इतरांकडून अपेक्षा ठेवण्याचा प्रश्‍नच शिल्लक राहिला नाही. नियमभंग झाल्याची बातमीसुद्धा नियमभंग करणाऱ्यांच्या “कोट’सह येऊ लागली.

टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर बोलताना या मंडळींनीही चपखल लॉजिक वापरलं. “त्यांनी अमूक केलं तर चालतं, मग आम्ही तमूक केलं तर का चालत नाही?’ असा करडा सवाल केवळ नेत्यांच्याच तोंडी नसून, तो सर्वसामान्यांच्याही ओठी आलाय, हे पाहून आम्ही कृतार्थ झालो.

म्हणजे, मी नियम पाळणार की नाही, हे इतरांवर अवलंबून असेल, ही आयडिया खरोखरच प्रत्येकालाच वेळेवर सुचायलाच पाहिजे. अलीकडच्या दिवसांत सगळ्यात मोठं कन्फ्यूजन जे दिसतंय, ते लशीसंदर्भात आहे. म्हणजे, लशी किती प्रभावी आहेत असा तो प्रश्‍न नाहीये.

आम्हाला अनेकजण असे भेटले, ज्यांनी पुढचे सात-आठ दिवस “कोरडं’ राहावं लागेल, या भीतीनं केवळ लस घेतलेली नाही. करोनाची लस घेतल्यानंतर मद्यपान केलं तर लशीची परिणामकारकता कमी होते का? हा सध्या अनेकांसमोरचा यक्षप्रश्‍न आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मद्यपानामुळे लसीचा प्रभाव कमी होतो, असं दर्शवणारा एकही थेट पुरावा मिळालेला नाही. परंतु अनेक डॉक्‍टरांचं असं म्हणणं आहे की, अतिमद्यपान केलं तर परिणाम होऊ शकतो. असं कन्फ्यूजन झालं की शौकिनांना खूपच त्रास होतो. काही डॉक्‍टर म्हणाले, लस घेतल्यावर ताप, अंगदुखी वगैरे त्रास होतात ते मद्यपान केलं तर कळत नाहीत. मग त्यावर उपचार होत नाहीत. म्हणून घेऊ नका!

काही डॉक्‍टरांनी थेट सांगितलं, की मद्यपान केलंत तर तुमची रोगप्रतिकार शक्‍तीच कमी होईल. “जिच्यासाठी केला अट्टहास’ ती शक्‍तीच जाणार म्हटल्यावर शौकिनांना अक्षरशः भरून आलं. डॉक्‍टरांचा आम्हाला सगळ्यात आवडलेला मुद्दा असा की, मद्यपान केल्यावर मास्क, सोशल डिस्टन्सिंग याचा विसर पडतो, म्हणून घेऊ नका!

हे खरंच आहे. एकदा आक्‍काबाई पोटात पोहोचली, तर मास्क किंवा अंतर आदीचं भान राखणं खरोखर अवघड आहे… मुळात भानच राखायचं तर घ्यायचीच कशाला? असाही मुद्दा काहींनी उपस्थित केला. पहिल्या लॉकाडाऊनच्या काळात “अर्थव्यवस्थेला उभारी देणारे’ असं बिरुद मिरवणाऱ्यांची लशीच्या बाबतीत जी अवस्था झालीय, तो कसला न्याय म्हणायचा? शिवाय दुसऱ्या लॉकडाऊनच्या भीतीनं “स्टॉक’ची जमवाजमव करण्याचं टेन्शन आलं ते वेगळंच! एकंदरीत घेतल्यावरच कन्फ्यूजन होतं असं नाही, तर घेण्यापूर्वीही होतं..!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.