घटनात्मक पदांच्या निवडणुकीचे वाद सुटणार
नवी दिल्ली- राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि सभापती यांच्या निवडणुकीच्या संदर्भात निर्माण झालेले वाद सोडविण्यासाठी एक नवा मंच निर्माण करण्यासंबंधीचे अधिकार संसदेला देणारे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत आज संमत झाले.
या 40व्या घटना दुरुस्ती विधेयकामुळे विद्यमान कायदान्वये या पदांसाठी असलेल्या उमेदवारांचे खटले कुठल्याही कोर्टासमोर सुनावणीस येणार नाहीत, अशीही तरतूद या विधेयकात केली आहे.
खासगी जंगले ताब्यात घेण्यासाठी विधेयक
मुंबई – ग्रामीण जनतेची विशेषतः आदिवासी, मागासवर्गीयांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी खासगी जंगले ताब्यात घेण्याची तरतूद असलेले विधेयक आज वन खात्याचे मंत्री आर. जे. देवताळे यांनी विधानसभेत मांडले.
राज्यात एकूण क्षेत्राच्या 21 टक्के क्षेत्रात जंगले आहेत. राष्ट्रीय सरासरीपेक्षा हे प्रमाण कमी आहे. दहा वर्षांपूर्वी नेमण्यात आलेल्या एका समितीच्या अंदाजानुसार राज्यात 8,985 किमी क्षेत्रातील खासगी जंगले वाईट अवस्थेत आहेत.