युद्ध भडकण्याची शक्यता धुसर
तेल अवीव, दि. 22 – इस्रायलचे माजी संरक्षण मंत्री ज. मोशे यांनी सांगितले की, इस्रायल व इजिप्त, सीरिया यांचे दरम्यान जो शस्त्रसंधी झाला आहे तो पुढील उन्हाळ्यापर्यंत जारी राहील व मध्यपूर्वेत मोठा संघर्ष होईल असे वाटत नाही. असे वाटते की, अमेरिका व रशिया ही राष्ट्रे मध्य-पूर्वीकडील संघर्ष टाळतील. कारण त्या युद्धांतून जागतिक युद्धे उद्भवण्याचा धोका आहे.
दीर्घमुदतीसाठी क्रुड ऑइल
नवी दिल्ली – संयुक्त अरब अमिरातीने भारताला बऱ्याच मोठ्या प्रमाणात किफायतशीर ठरेल अशा दराने दीर्घमुदतीसाठी क्रुड ऑइल पुरविण्याचे मान्य केले, असे अमिरातीचे विदेश मंत्री खलिफ अल सुवैदी यांनी जाहीर केले.
लेनिन आणि गांधीवादावरही विश्वास
भोपाळ – गांधीवाद आणि लेनिनवाद यांच्या मिश्रणातून आपले तत्त्वज्ञान तयार झाले असल्याचे सर्वोदयी नेते जयप्रकाश नारायण यांनी सांगितले. नारायण म्हणाले, “माझे सुरुवातीचे धडे मी लेनिनकडून घेतले. त्याचवेळी माझा गांधीवादावरही विश्वास होता.’ ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीपासून दूर राहून जनतेत काम केले पाहिजे तर विधिमंडळातील पुढाऱ्यांनी जनतेचा आवाज उठविण्याचे काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
उत्पादनवाढीने गरिबी हटणार
सोलापूर – गरिबी हटाव म्हटल्याने देशातील गरिबी हटणार नसून देशाच्या सर्व क्षेत्रातील उत्पादनात वाढ झाल्यानेच ती हटणार आहे, असे विचार प्रसिद्ध उद्योगपती हिराचंद यांनी व्यक्त केले आहे.