– ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहुकर
एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती । तेंचि येर अनुष्ठिती। सामान्य सकळ ।।158।। हें ऐसें असे स्वभावें । म्हणौनि कर्म न संडावें । विशेषें आचरावें। लागे संतीं ।।159।।
माऊली म्हणतात या मृत्यूलोकात थोर वडीलधारी व्यक्ती धर्माचा खरा अर्थ जाणून जे जे आचरण करतात त्यालाच सामान्य लोक धर्म असे समजतात. त्याच कर्माचे ते सारासार विचार न करता आचरण करतात. असे हे श्रेष्ठ वडीलधाऱ्या थोर व्यक्तीच्या आचरणाचे अनुकरण करणे सामान्य समाजाची स्वभाविक वृत्ती असल्यामुळे थोर ज्ञानी व्यक्तींनी स्वकर्म अनुष्ठानाचा कधीही त्याग करू नये.
साधू-संतांनी विशेष प्रयत्न करून धर्माचरण करणे आवश्यक आहे. सामान्य लोक किंबहुना लहान मुले अनुकरणप्रिय असतात. मोठे जसे आचरण करतात तसेच्या तसे अनुकरण करण्याचा त्यांचा अट्टाहास असतो. म्हणून साधू-संतांना, थोर व्यक्तींना समाजकल्याण करायचे असेल, योग्य मार्ग दाखवायचा असेल तर धर्माचरण करणे क्रमप्राप्त आहे.