डेमॉक्रॅटिक पक्षाचे जिमी कार्टर यांचा प्रचंड विजय
न्यूयॉर्क, दि. 3 – डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जिमी कार्टर आज गेराल्ड फोर्ड यांचा दणदणीत पराभव करून अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आले. कार्टर यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाचे सिनेटर वाल्टर मॉडेल हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.
1849 सालानंतर म्हणजे 126 वर्षांनंतर दक्षिणेकडील भागातील उमेदवार अध्यक्षपदी निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. कार्टर हे जॉर्जिया संस्थानातील एक शेतकरी आहेत. ते 52 वर्षांचे आहेत. 63 वर्षे वयाचे फोर्ड यांनी त्यांच्या 28 वर्षांच्या राजकीय जीवनात प्रथमच ही राष्ट्रीय पातळीवरची निवडणूक लढविली.
पगाराचा दिवस कोरडा दिवस; नवे दारूबंदी धोरण
मुंबई – 1 जानेवारीपासून सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बंदी करण्याचा त्याचप्रमाणे पगाराच्या दिवशी “कोरडा दिवस’ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. दारूबंदी खात्याच्या मंत्री प्रतिभा पाटील यांनी सरकारचा हा निर्णय आज घोषित केला.
दारूबंदी नसल्याने व दारू सैल केल्याने दारूचा वापर वाढला आहे. गावठी दारूचा वापर काही प्रमाणात घटला आहे. दारूबंदी राबवणारी यंत्रणा पुरेशी कार्यक्षम नव्हती. पण आता ती कार्यक्षम करण्यात आली आहे, असेही पाटील म्हणाल्या. आदिवासी विभागात प्रभावीपणे दारूबंदी राबविली जाणार आहे.