स्वागत पुस्तकांचे : टू सर, विथ लव्ह

– माधुरी तळवलकर

अलीकडेच मी “टू सर, विथ लव्ह’ हे मेहता प्रकाशनचं एक पुस्तक वाचलं. ही गोष्ट आहे लंडनमधल्या विद्यार्थ्यांची. हे विद्यार्थी कसे आहेत? थोराड, असंस्कृत आणि उद्धट. या शाळेतल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नुकतंच एका शिक्षकाला तिथून पळवून लावलेलं असतं आणि त्याच्या जागेवर ब्रेथवेट नावाचा शिक्षक रूजू होतो. हे पुस्तक इंग्रजीत ई.आर. ब्रेथवेट यांनीच लिहिलंय आणि लीना सोहोनी यांनी त्याचा मराठीत अनुवाद केलेला आहे.

लेखक हा उच्चशिक्षित, बुद्धिमान असा इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर आहे. पण त्याचा दोष एकच… तो कृष्णवर्णीय आहे! त्वचेच्या काळ्या वर्णामुळं त्याला जागोजागी मानहानीला तोंड द्यावं लागतं आणि अखेर निराश होऊन तो लंडनच्या ईस्ट एन्ड या गरीब, बदनाम, गलिच्छ वस्तीतील एका शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करतो.

हळूहळू एकेका मुलाची, मुलीची वैशिष्ट्यं सरांच्या लक्षात येतात. निरीक्षणावरून ते काही अंदाज बांधतात. त्यांचे स्वभाव जाणून घेतात. ह्या सरांनाही कोंडीत पकडण्याचा, रागाला आणण्याचा पोरांकडून पुष्कळ प्रयत्न होतो. पण यावर एकच उपाय आहे असं सरांचं म्हणणं असतं… “मुलांचा विश्‍वास संपादन करणं!’ त्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात. रोज नवीन नाट्य, नवीन प्रसंग. प्रत्येक वेळी आपल्याला उत्सुकता वाटत राहते, आता कसं होणार? पण सरांनी ठरवलेलंच असतं, या मुलांवर विश्‍वास ठेवायचा. त्यांच्यावर जबाबदारी टाकायची. त्यांना प्रेमानं जिंकून घ्यायचं. कधी रागावून, कधी गोड बोलून, कधी समजावून सांगून. बऱ्याचशा मुला-मुलींच्या वागण्या-बोलण्यात फरक पडू लागतो. मुलं त्यांचं ऐकू लागतात. मुलांच्या घरच्यांनाही या सरांबद्दल आदर वाटू लागतो.

सतत भांडणारी, शिक्षकांशी शत्रुत्वानं वागणारी मुलं हळूहळू शहाण्यासारखी वागू लागतात. पण काही शिक्षकांचाच दृष्टिकोन अजूनही दूषितच असतो. अशाच एका शिक्षकामुळे पॉटर हा विद्यार्थी जखमी होतो. ते पाहून दुसरा विद्यार्थी डेनहॅम याचा संयम सुटतो आणि तो त्या शिक्षकावर धावून जातो. ऐन वेळी हे सर येतात आणि त्या शिक्षकाची सुटका करतात. डेनहॅमला शिक्षकांवर हात उगारल्याबद्दल क्षमा मागायला सांगतात. सर म्हणतात, “जगात तुम्हाला न आवडणाऱ्या अनेक गोष्टी घडतील. प्रत्येक वेळी तुम्हाला राग आला की तुम्ही दंडुक्‍यांचा आणि सुऱ्यांचा आधार घेणार का? …तुम्ही ही शाळा सोडून बाहेरच्या जगात पाऊल टाकल्यावर तिथं कसं वागाल, तिथं तुमचं वर्तन कशा प्रकारचं असेल, त्यावरच हेडमास्तरांचं यशापयश अवलंबून आहे.’

मुलांच्या शाळेचा शेवटचा दिवस उगवतो. सरांना सोडून जायचं मुलांच्या जिवावर येतं. शेवटी एकजण उभी राहते आणि डोळ्यातलं पाणी आवरत त्यांच्या हातात एक भलंमोठं पार्सल ठेवलं जातं. त्यावर लिहिलेलं असतं, “टू सर, विथ लव्ह’. हे सगळं वाचताना अनेकदा घशात आवंढा येतो. आपल्याकडच्या झोपडपट्टीतल्या मुलामुलींची आठवण येते. वाटतं, ह्या सगळ्यांनाच अशाच एका सरांची गरज आहे. ह्यांनाही मिळायला हवेत असे समजावून सांगणारे सर!

कादंबरी वाचून संपते, तेव्हा आपण भारावून गेलेलो असतो. आपल्या डोळ्यासमोर आपल्या इथलंच गाव, गरीब घरातली, घरच्यांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळं उंडारणारी मुलं उभी राहतात. वर्णविद्वेषासारख्या प्रक्षोभक विषयाची अत्यंत संयत हाताळणी करणारी ही एक आत्मचरित्रात्मक सत्यकथा आहे. हे पुस्तक वाचून झाल्यावर इतकं सुंदर पुस्तक वाचायला मिळालं, याचा भरभरून आनंद मनात रेंगाळत राहतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)