आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विश्‍वनाथन आनंदची आरोनियनशी बरोबरी

झाग्रेब – भारताच्या विश्‍वनाथन आनंद याने अर्मेनियाच्या लिवोन आरोनियन याला बरोबरीत रोखले आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आव्हान राखले. आनंद याला आधीच्या लढतीत विश्‍वविजेत्या मॅग्नुस कार्लसन याच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

आनंद याने आरोनियनविरुद्ध इटालियन तंत्राचा उपयोग करीत डावाचा प्रारंभ केला. त्याने थोडीशी जोखीम घेत विजय मिळविण्यासाठी योग्य स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तथापि आरोनियन याने त्याच्या या डावपेचांना योग्य प्रत्युत्तर दिले. डावामध्ये विजय मिळविण्यास फारसा वाव नाही हे लक्षात आल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली.

रशियाच्या इयान नेपोम्निछिची याने सलग तिसरा विजय नोंदविताना अझरबैजानच्या शाख्रीयर मामेद्यारोव्ह याचा सहज पराभव केला. या विजयासह त्याने आघाडीस्थान राखले आहे. कार्लसन याच्याविरूद्ध अनीष गिरी याने केवळ 23 चालींमध्ये बरोबरी केली व आश्‍चर्यजनक निकाल नोंदविला. गिरी याने याआधी आरोनियन याच्याविरूद्धचा डावही बरोबरीत ठेवला होता. तिसऱ्या फेरीतील अन्य लढतीत फ्रान्सच्या मॅक्‍झिम व्हॅचिअर लाग्रेव्ह याने चीनच्या दिंग लिरेन याला बरोबरीत रोखले.

Leave A Reply

Your email address will not be published.