आठवण : गावाकडच्या आठवणी

-सत्यवान सुरळकर

धोंडी धोंडी पाणी दे…
सायमाय पिकू दे…

असा गलका करत पोरांचा लोंढा दारोदारी जायचा. मीही त्या गर्दीतला एक. धोंडी धोंडी म्हणत पोरांच्या मागे पळत सुटायचो…

आमचे मायबाप पावसाची आतुरतेने वाट पाहायचे तो महिना म्हणजे धोंडीचा महिना. आम्ही लहान मुले पाऊस पडावा म्हणून “धोंडी’ काढायचो. आमच्यातील एकाला “धोंडी’ बनवले जायचे. त्याच्या डोक्‍यावर भला मोठा निंबाच्या झाडांचा पाला बांधलेला असायचा. त्यात एक बेडूकही बांधलेले असायचं. निंबाचा पाला व बेडूक पकडून आणण्याचे महत्कार्य आमच्यावर सोपवलेलं असायचं. निंबाच्या झाडावर शेंड्यापर्यंत चढून कोवळ्या लहान फांद्या तोडून त्या दोरीने बांधून धोंड्याच्या डोक्‍यावर त्याचे पूर्ण तोंड झाकले जाईल असे बांधायचो. तर नाल्यात उतरून भला मोठा बेडूक पकडल्यावर विजयी जल्लोषात आम्ही नाचायचो.

धोंडी बनलेला मुलगा घरोघरी जाऊन घरासमोर ओरडायचा, “धोंडी… धोंडी…’ त्यापाठोपाठ आम्ही बेंबीच्या देठापासून मोठ्यानो ओरडायचो, “पाणी… दे…’ त्या घरातील स्त्री धोंडीच्या डोक्‍यावरील निंबाच्या पाल्यावर तांब्याभर पाणी टाकायची. त्याचबरोबर आम्ही आमच्याकडचे भांडे पुढे करायचो. आमच्या भांड्यात कपभर गव्हू, तांदूळ, पळीभर तेल, मूठभर तुरीची डाळ आणि चमचाभर डालडा मिळायचा. घरोघरी जाऊन धोंडी-धोंडी पाणी दे म्हणत आम्ही ओलेचिंब भिजायचो. त्यासोबतच धान्यही गोळा करायचो.

जमवलेले हे धान्य म्हणजे आमचा “सणवार’. या धान्यापासून आमच्यातील मोठ्या मुली जेवण बनवायच्या. रोटगा, वरण आणि त्यात डालडा, असा खास जेवणाचा बेत असायचा. आम्हा चिल्ल्यापिल्ल्यांची भली मोठी पंगत बसायची. पोटभर रोटगा खाऊन आमचा “सण’ उत्साहात साजरा व्हायचा. धोंडीनंतर हमखास पाऊस पडायचा. तेव्हा गावातील म्हाताऱ्या बाया म्हणायच्या, “धोंड्या पावला’. भरपावसात मग आम्ही मुले पावसात नाचायचो व जोरात ओरडायचो…

“धोंडी धोंडी पाणी दे
सायमाय पिकू दे…’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here