अबाऊट टर्न: नेपथ्य

हिमांशू

महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत दोन दिवसांपूर्वी भीतीची मोठी लाट पसरली. तुमच्या मोबाइलवर 140 क्रमांकाने सुरू होणारा कॉल घेतलात तर तुमचं बॅंक अकाउंट रिकामं होईल, असा इशारा पोलिसांच्या वाहनातून मेगाफोनवरून देण्यात येत असल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला.

खुद्द पोलिसांनासुद्धा हा धक्‍काच होता, कारण अशी कोणतीही घोषणा पोलिसांकडून अधिकृतपणे केली जात नव्हती. मग पोलिसांच्या वेशात, त्यांच्याच गाडीतून लोकांना इशारे कोण देतोय? शोध घेता-घेता समजलं, की तो एका वाहिनीवरच्या नव्या सीरिअलचा “प्रमोशनल व्हिडिओ’ आहे. मग कुणी घाबरून जाऊ नका, असं स्टेटमेन्ट पोलिसांनी दिलं आणि वाहिनीवर काही कारवाई होणार का, अशी चर्चा सुरू झाली.

तांत्रिक बाबी तपासल्यावर सायबर सेलकडून कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असं समजलं. प्रमोशनल व्हिडिओ झटपट व्हायरल व्हावा या हेतूनं कदाचित हा मार्ग अवलंबिला गेला असेल; परंतु एरवीसुद्धा अनेकजण असे अनेक बकवास मेसेज बिनदिक्‍कत फॉरवर्ड करत असतात. विशेषतः “जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा,’ अशी तळटीप पाहिली की आमचे कान आपोआप उभे राहतात. परंतु असंख्य लोक ही तळटीप ताबडतोब अंमलात आणतात आणि मग भीतीची एक लाट पसरते.
“फेक न्यूज’चा बाजार एवढा वाढलाय, की खरी बातमी शोधावी लागते. एखाद्या वेळी “लांडगा आला रे आला’ गोष्टीसारखीही गत होते.

“फेक न्यूज’ पसरवण्यासाठी माणसं सोशल मीडियावर “फेक अकाउंट’ उघडतात. आर्थिक फसवणूक करण्यासाठी बॅंकेत “फेक अकाउंट’ उघडतात. परंतु बॅंकेची आख्खी शाखाच
“फेक’ उघडण्यात आल्याची घटना ऐकून कानावर विश्‍वास बसेना. परंतु नामांकित इंग्रजी दैनिकांनी दुपारी ही बातमी दिल्यामुळे बातमी फेक नसून शाखा फेक आहे, यावर हळूहळू विश्‍वास बसला.

तमिळनाडूत शनिवारी पोलिसांनी तिघांना अटक केली. कुड्डलूर जिल्ह्यात चक्‍क स्टेट बॅंक ऑफ इंडियाची बनावट शाखा सुरू केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गंमत म्हणजे, लॉकडाऊन सुरू असताना, एप्रिल महिन्यात या बहाद्दरांनी ही फेक शाखा सुरू केली होती. त्याच शहरात असलेल्या दुसऱ्या एका शाखेच्या अधिकाऱ्याकडे एका ग्राहकानं “या’ शाखेसंबंधी चौकशी केली, तेव्हा खरा प्रकार उजेडात आला.

नव्या शाखेतून मिळालेली पावतीच या ग्राहकाने दाखवली आणि शहानिशा करण्यासाठी बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी “या’ शाखेला भेट दिली. शाखेचं संपूर्ण “नेपथ्य’ हुबेहूब स्टेट बॅंकेच्या अन्य शाखांप्रमाणे उभारलेलं बघून बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी तोंडात बोटं घातली. कागदपत्रं, स्लिपा, शिक्‍के, छापील पाकिटं… सगळं काही हुबेहूब! या घटनेचा मास्टरमाइंड हा स्टेट बॅंकेच्या कर्मचाऱ्याचा मुलगा आहे आणि त्यामुळे लहानपणापासूनच तो बॅंकेचे व्यवहार जवळून पाहत होता.

बॅंकेच्या “या’ शाखेत भरलेली रक्‍कम गायब झाल्याची किंवा शाखेकडून फसवणूक झाल्याची तक्रार अद्याप या शाखेच्या एकाही ग्राहकाने केलेली नाही. कुणाला संशयच आला नाही, इतकं सगळं हुबेहूब! कदाचित काही महिन्यांनी या शाखेच्या सगळ्याच ग्राहकांना कपाळावर हात मारून घ्यावा लागला असता, कारण एके दिवशी त्यांना शाखा बंद दिसली असती. परंतु तत्पूर्वीच शाखेचे “चालक’ गजाआड गेलेत. शाखेत भरलेले पैसे किती जणांना परत मिळणार? हिशोब होईल तेव्हाच कळेल!

Leave A Reply

Your email address will not be published.