नवी दिल्ली – भोपाळमध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने चर्च ऑफ नॉर्थ इंडिया (सीएनआय)च्या नागपूर कार्यालयासह देशभरात 14 ठिकाणी छापे टाकत कारवाई केली.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीएनआयच्या जबलपूर डायोसीजचे बिशप पी. सी. सिंग यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणाशी संबंधित आज ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. शहरातील सदर भागात असलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या सीएनआय कार्यालयाची झडती घेण्यात आली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
दरम्यान, सिंग यांच्यावर सप्टेंबर 2022मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना चौकशीसाठी महाराष्ट्रातील नागपूर विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी मध्य प्रदेश पोलिसांनी जबलपूर येथील बिशपच्या निवासस्थानातून सुमारे 1.6 कोटी रुपये आणि विदेशी चलन जप्त केले होते.
बिशप सिंग यांच्या विरोधात जुलै 2022 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये ते अध्यक्ष होते त्या शैक्षणिक संस्थेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 2004-05 ते 2011-12 या कालावधीत समाजाच्या विविध संस्थांकडून विद्यार्थ्यांच्या शुल्कापोटी जमा केलेले 2.7 कोटी रुपये कथितरित्या धार्मिक संस्थांमध्ये हस्तांतरित करण्यात आले होते. या रकमेतील काही भाग सीएनआयच्या नागपूर कार्यालयातही वर्ग करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.