श्रीनगर – जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेमधील
गैरव्यवहारासंदर्भात सक्तवसुली संचलनालयाने आज नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची चौकशी केली. फारुख अब्दुल्ला जम्मू- काश्मीर क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असताना झालेल्या 43 कोटी रुपयांच्या अफरातफरीबद्दल ही चौकशी करण्यात आली. “ईडी’ने पाठवलेल्या समन्सला नॅशनल कॉन्फरन्सच्या वतीने उत्तर दिले जाईल, असे फारुख यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.
गुपकार जाहीरनाम्यासाठी झालेल्या नागरी आघाडीनंतर लगेचच झालेली ही चौकशी म्हणजे राजकीय सूड असल्याची टीकाही ओमर अब्दुल्ला यांनी केली. फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी थेट छापा न घालण्यासाठी त्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.
फारुख अब्दुल्ला यांनी 15 ऑक्टोबर रोजी आपल्या निवासस्थानी एक सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती.
जम्मू- काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर करण्यात आलेल्या गुपकार जाहीरनाम्यासंदर्भातील भविष्यातील कृती ठरवण्यासाठी या बैठकीत विचार करण्यात आला होता. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या मेहबुबा मुफ्ती, सज्जाद लोन आणि अन्य प्रादेशिक गटांचा या आघाडीमध्ये समावेश आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या नागरिकांना गेल्या वर्षापूर्वीचे सर्व अधिकार देण्यात यावेत, अशी मागणीही अब्दुल्ला यांनी केली होती. अजूनही नजरकैदेत असणाऱ्या इतरा नेत्यांचीही त्वरित सुटका करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.