नवी दिल्ली – हवाई वाहतुक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने शनिवारी कॉर्पोरेट लॉबिस्ट दीपक तलवारच्या निकटच्या सहकारी यास्मीन कपूर आणि अन्य काही जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. “ईडी’ने दाखल केलेल्या या पुरवणी आरोपपत्रामध्ये यास्मीन कपूर, दीपक तलवार अणि काही कंपन्यांची नावे आहेत.
सीबीआयच्या विशेष न्यायाधीश अनुराधा शुक्ला भारद्वाज यांनी या पुरवणी आरोपपत्राची दखल घेतली आणि कागदपत्रंच्या सुरक्षिततेसाठी या प्रकरणाची सुनावणी 7 जानेवारी रोजी निश्चित केली.
यास्मीन आणि दीपक तलवार दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. एअर इंडियाचे फायद्यात असलेले हवाई मार्ग खासगी विमान कंपनीला खुले करून फायदा कमावण्याच्या संदर्भात “ईडी’ने कपूर यांना अटक केली आहे. “ऍडव्हांटेज इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेच्या संदर्भात विदेशी चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाच्या अन्य एका प्रकरणातही त्या आरोपी आहेत. जामिनाचा दुरुपयोग यास्मीन कपूर यांच्याकडून केला जात असल्याचे सीबीआयने कोर्टात सांगितल्यावर यास्मीन कपूर यांना 22 मार्च रोजी मंजूर झालेला अटकपूर्व जामीन याच विशेष न्यायालयाने पूर्वी रद्द केला आहे.
तर दीपक तलवार आणि दुबईमधील उद्योगपती राजीव सक्सेना यांना याच वर्षी दुबईवरून भारतात आणण्यात आले आहे. कॉर्पोरेट लॉबी करण्याच्या प्रकरणात राजीव सक्सेना सहभागी असल्याचा “ईडी’चा दावा आहे.
या सर्व मध्यस्थांना 2008- 09 दरम्यान खासगी विमान कंपन्यांकडून 272 कोटी रुपयांची दलाली मिळाल्याचा “ईडी’चा आरोप आहे. खासगी विमान कंपन्यांना फायद्यातील हवाई मार्ग मिळवून देण्याच्या त्यांच्या कामामुळे एअर इंडियाला मोठा तोटा झाला.