इ सिगारेटवर केंद्राची बंदी

नवी दिल्ली : इलेक्‍ट्रॉनिक सिगारेटस्‌चे उत्पादन, आयात, वितरण आणि विक्रीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने बंदी घातल्याची माहिती या प्रश्‍नावरील नेमलेल्या मंत्रीगटाच्या प्रमुख निर्मला सीतारामन यांनी दिली. युवकांना असणाऱ्या धोक्‍यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

यापुर्वी महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, तमिळनाडू, झारखंड, राजस्थान आणि मिझोराम या राज्यांनी इ सिगारेटस्‌, व्हॅप आणि इ हुक्कावर यापुर्वीच बंदी घातली आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळाने इ सिगारेट बंदीला मंजुरी दिली. त्या म्हणाल्या, काही युवकांसाठी इ सिगारेट हे प्रतिष्ठेचे लक्षण बनले होते. त्यात खूप छान दिसतो म्हणूनही काही जणांना त्याचे व्यसन लागले होते. भारतात याचे सुमारे 400 ब्रॅंड असून दीडशे फ्लेवर्समध्ये ती उपलब्ध आहे. मात्र, त्याचे उत्पादन भारतात अद्याप होत नाही, असे त्या म्हणाल्या.

याबाबतचा वटहुकूम सरकार काढेल. या बाबातचे विधेयक पुढील अधिवेशनात मंजूर करण्यात येईल. संसदेत हे विधेयक मंजूर केल्यानंतर त्याला कायदेशीर पाठबळ मिळेल.

केंद्र सरकारच्या 100 दिवसांच्या उद्दीष्टांमध्ये इ सिगारेटस्‌ बंदीचा निर्णय होता. केंद्रीय औषध मानांकन नियंत्रण संस्थेने फेब्रुवारी महिन्यात याबाबतचे परिपत्रक काढले होते. दिल्ली उच्च न्यायलयाने हे औषध नसल्याने हे परिपत्रक रद्दबातल ठरवले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.