घोडगंगा साखर कारखान्याच्या बगॅस डेपोला आग

न्हावरे : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या शेजारी साठवून ठेवलेल्या बगॅस डेपोला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.या आगीमुळे कारखान्याचेही काही प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती कारखाना प्रशासना कडून देण्यात आली आहे. घटनास्थळी तातडीने अग्निशामक दल दाखल झाल्याने एका तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

आगीमध्ये काही प्रमाणावर बगॅस व कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी बगॅस वाहून नेणारा रबरी बेल्ट जळून खाक झाला आहे. दरम्यान ज्यावेळी बगॅसला आग लागली त्यावेळी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी ती आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऊन व वाऱ्यामुळे आगीने उग्र रूप धारण केले. तसेच या बगॅस डेपोच्या जवळच कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी बगॅस वाहून नेणारा रबरी बेल्ट असल्यामुळे तोही पेटला. त्यामुळे कारखाना परिसरात धुराचे मोठ्या प्रमाणावर लोट दिसू लागले होते. मात्र, अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे एक तासाच्या आत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. याप्रसंगी रांजणगाव गणपती ओद्योगिक वसाहत येथून एक अग्निशामक दलाची गाडी मदतीला आली होती.

यावेळी माध्यमांशी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार अशोक पवार यांनी सांगितले की,कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पा शेजारी असलेल्या बगॅसला आग लागली. बगॅसच्या शेजारीच बगॅस वाहून नेणारा रबरी बेल्ट असल्यामुळे त्यालाही आग लागून कारखान्याचे नुकसान झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.