गुडघ्याच्या दुखापतीवर सोपे उपचार

श्रावण हा 22 वर्षांचा जिम्नॅस्ट आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सराव करत होता. या सरावादरम्यान त्याचा गुडघा मुरगळला. पाय जमिनीवर टेकवताना त्याला पॉप असा आवाज गुडघ्यातून ऐकू आला. वेदना तीव्र होत्या. दुखावलेल्या पायावर तो जेमतेम स्वत:चे वजन टाकू शकत होता.

तो लंगडतच सरावाच्या क्षेत्रातून बाहेर गेला. गुडघ्यावर सूज येऊ लागली आहे हे त्याच्या लक्षात आले, तो गुडघा वाकवू किंवा सरळ करू शकत नव्हता. त्या पायावर वजन घेता येईल की नाही याची खात्री त्याला वाटत नव्हती. आपला गुडघा निखळतोच की काय असे त्याला वाटत होते.

अशा प्रकारच्या गुडघ्याच्या दुखापती केवळ जमिनीवर उडी मारणाऱ्या, खेळ सुरू असताना अचानक पाय वळवणाऱ्या किंवा पिळणाऱ्या किंवा अचानक थांबणाऱ्या क्रीडापटूंनाच होतात असे नाही. तर न खेळणाऱ्यांनाही अशा प्रकारच्या दुखापती होतात. रस्त्यावरील अपघातांमध्ये, घरात पडल्यामुळे किंवा नृत्य करतानाही याच प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

यासाठी केले जाणारे सामान्य उपचार म्हणजे एक्‍स-रे काढणे (यामध्ये सहसा काही आढळून येत नाही), बर्फाने शेकणे, गुडघ्याला विश्रांती देणे आणि काही वेदनाशामक औषधे घेणे. थोडी विश्रांती घेतल्यानंतर गुडघा बरा झाल्यासारखे वाटते पण वास्तवात तो पूर्वपदावर आलेला नसतो. सामान्य दिनक्रमातील कृती सुरू केल्यानंतर व्यक्‍तींना जिने उतरताना, उतारावरून चालताना किंवा असमतल पृष्ठभागावरून चालताना त्रास होतो.

कारमधून उतरणे किंवा कोणी हाक मारल्यास अचानक दुखावलेला पाय पुढे टाकून प्रतिसाद देणे यांसारख्या साध्या कृतींमुळे मागे सांगितलेली सर्व लक्षणे जाणवू लागतात. गुडघा अचानक काम करणेच थांबवतो. असे पुनःपुन्हा घडल्यास वेदना सुरू होतात, चालताना लंगडावे लागते आणि गुडघ्याची हालचाल बंद होते.

गुडघा सरकण्याचे प्रकार पुनःपुन्हा घडल्यास गुडघ्याची आणखी हानी होते. तज्ज्ञांना दाखवून वेळीच निदान व व्यवस्थापन करवून घेतले नाही, तर गुडघ्याच्या रचनेत कधीही दुरुस्त होणार नाहीत असे बदल घडून येऊ शकतात.

गुडघ्याची सखोल तपासणी केल्यानंतर तसेच एक्‍स-रे केल्यानंतर, एमआरआयमुळे समस्या अधिक चांगल्या पद्धतीने कळू शकते. एक्‍स-रे हाडाची स्थिती तसेच एका मर्यादेपर्यंत सांध्याची स्थिती दाखवतो पण एमआरआयमध्ये मऊ पेशींना (सॉफ्ट टिश्‍यूज) झालेल्या दुखापतीचे तपशील कळतात आणि या पेशी सांध्यांच्या कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत असतात.

गुडघ्याची सूज कमी व्हावी म्हणून श्रावणला (रेस्ट, आइस, कंप्रेशन आणि एलिव्हेशन) हा उपचार सांगितला, स्नायूंमधील शक्‍ती टिकून राहावी तसेच हालचाल पुन्हा सुरू व्हावीत यासाठी काही सौम्य स्वरूपाचे व्यायाम दिले. मग गुडघ्याची पुन्हा तपासणी करून निदानाची खात्री करण्यात आली. श्रावण हा एक तरुण जिम्नॅस्ट असल्यामुळे त्याला आर्थरोस्कोपी शस्त्रक्रिया करवून घेण्याचा सल्ला दिला.

सांध्यांच्या शस्त्रक्रिया करण्याच्या पद्धतीत आज तंत्रज्ञानात्मक प्रगतीमुळे प्रचंड बदल घडून आलेला आहे. आता सर्जन्स मोठा छेद घेऊन सांधा उघडत नाहीत. त्याऐवजी की होल सर्जरी केली जाते. यामध्ये निदानात अधिक अचूकता येते. त्याचबरोबर विशिष्ट उद्दिष्टाने शस्त्रक्रिया केली जाते. सांध्यांच्या विविध विकारांवर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियात्मक उपचारांमध्ये सध्या अशा पद्धतीची शस्त्रक्रिया प्रमुख आहे.

आर्थोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये (सांध्यासाठीची की-होल सर्जरी) सांध्याच्या आतपर्यंत पोहोचण्यासाठी 2 ते 4 छोटे छेद केले जातात. एण्डोस्कोपिक प्रक्रियांसाठी फायबरऑप्टिक तंत्रज्ञान वापरले जाते. 4 मिमी व्यासाचा टेलिस्कोप एका छेदातून आत घातला जातो, अन्य छेद उपकरणांसाठी वापरले जातात. त्याचा मेनिस्कस टीअर दुरुस्त केला व टेंडनचा वापर करून एसीएलची फेररचना केली. त्यानंतर श्रावणला फिजिओथेरपी देण्यात आली आणि तो त्याची आवड असलेले जिम्नॅस्टिक्‍स पुन्हा करू लागला.

डॉ. अनंत जोशी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)