आज अक्षय तृतीया…

साडेतीनपैकी एका मुहूर्तावर पुणेकर यंदाही घरीच

पुणे -वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणत असून, हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. देशाच्या विविध भागांमध्ये आखिती, आखातरी असेही म्हणतात. शुक्रवारी घरोघरी अक्षय तृतीया साजरी होणार आहे. करोना तसेच लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर गेल्यावर्षीही हा मुहुर्त साधता आला नाही तर यावर्षीही हा मुहुर्त पुणेकरांना घरी राहुनच साधावा लागणार आहे.
गुढीपाडवा, बलिप्रतिपदा (पाडवा), दसरा आणि अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्त आहेत.

देशातील विविध प्रांतामध्ये पूजाअर्चा, वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दक्षिणेकडे हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याशिवाय यादिवशी “करा’ची (मातीचा माठ) पूजा करून, आमरसाचा नैवेद्य दाखवला जातो. अक्षय तृतीयेला चैत्रात बसवलेल्या चैत्र गौरीचे विसर्जन करतात. यादिवशी कैरीची डाळ, पन्हे करण्यात येत असून, हळदीकुंकू केले जाते. अक्षय तृतीयेला नवा आंबा बाजारात दाखल होतो.

अक्षयतृतीयेचे औचित्य साधून नागरिक सोने-चांदी, वाहने, घर, गृहोपयोगी वस्तू, इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे आदींची खरेदी करतात. मात्र यंदा हा मुहूर्त मात्र हुकणार आहे. या दिवशी नागरिक अनेक शुभ कार्यांचा प्रारंभदेखील करतात. या दिवशी दानधर्मालादेखील महत्त्व आहे. दान केल्याने अक्षय पुण्य लाभते, असे म्हटले जाते. अक्षय, चिरकाल हव्या असणाऱ्या गोष्टी अक्षय तृतीयेला कराव्यात, अक्षयतृतीयेला केलेली खरेदी कधीही क्षय होत नाही, असे मानले जाते. अक्षय तृतीया ही भारतीयांसाठी साडेतीन मुहूर्तापैकी मंगल शुभारंभ कार्यासाठी सर्वोत्तम तिथी आहे.

याच दिवशी भगवान परशुराम जयंती, महात्मा बसवेश्‍वर जयंती आणि रमजान ईद हे सर्वच एकत्र आल्याने सर्व भारतीयांसाठी मंगलकारक आणि महोत्सवी पवित्र सण आहे. शुक्रवारी दुपारी 12.35 ते सायंकाळी 7 या शुभकाळी दानधर्म करावे, अशी माहिती शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.