लातूर – जिल्ह्याचा करोना पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांपेक्षाखाली आलेला आहे. परंतू काही तालुक्यांचा पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यामुळे सर्व तहसीलदार यांनी त्यांच्या तालुक्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी येण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रत्येक तालुक्यात करोना चाचण्यांची संख्या वाढवावी, असे आदेश अमित देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा करोना आढावा बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते.
अमित देशमुख म्हणाले, लातूर जिल्ह्यात करोनाची संख्या कमी होत असून जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 10 टक्क्यांपेक्षा कमी झालेला आहे. परंतू काही तालुक्यांचा पॉझिटिव्हटी रेट दहा टक्क्यांपेक्षा अधिक असून या तालुक्यांनी करोना चाचण्यांची संख्या वाढवून जास्तीत जास्त संशयित रुग्णांची तपासणी करावी. एखाद्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर करोनाबाधित रुग्ण आढळल्यास त्या गावातील प्रत्येक व्यक्तीची करोना चाचणी करावी.
आरोग्य विभागाने येणाऱ्या संभाव्य कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता ठेवावी. त्यामुळे लातूर शहरातील आरोग्य यंत्रणेवर ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांचा ताण वाढणार नाही.
तसेच हे व्हेंटिलेटर चालविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी त्यांच्याकडील डॉक्टर्स उपलब्ध करून द्यावेत. या डॉक्टर्सना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने व्हेंटिलेटर चालविण्याचे प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.