राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड (राजगुरूनगर) जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात ई फायलिंग सुविधा केंद्राचें उद्घाटन येथील मुख्य न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्या हस्ते झाले.
खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आवारात ई फायलिंग सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. गुरुवारी (दि. 4) त्याचे उद्घाटन खेड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. एस. सय्यद, सह जिल्हा न्यायाधीश एस. बी. पोळ यांच्या हस्ते झाले.
यावेळी खेड तालुका बार असोशियशन अध्यक्ष अॅड. रोहिदास टाकळकर व कार्यकारिणी सदस्य यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. पोपटराव तांबे, अॅड. बी. एम. सांडभोर,अॅड. मुकुंदराव आवटे, अॅड. जे. बी. ओसवाल, अॅड. संजय गोपाळे, अॅड. संदीप घुले, अॅड. निलेश चौधरी, अॅड. शाम बवले, अॅड. संदीप रेटवडे, अॅड. गणेश गाडे, अॅड. दीपक गावड यांच्यसह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशातील प्रत्येक न्यायालयात ई फायलींग सुविधा वकील वर्गासाठी दिवाणी व फौजदारी कामे व इतर न्यायालयीन कामकाजातील प्रकरणे ऑनलाइन दाखल करण्यासाठी सुरू केली आहे. वैधानिक कागदपत्रांचे इलेक्ट्रॉनिक फायलिंग करण्याकरिता ई-फायलिंग पद्धती उपयोगात येते.
उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालये यांनी ई-फायलिंग प्रणाली अंगिकारली असून त्याद्वारे न्यायप्रकरणे (दिवाणी आणि फौजदारी, दोन्हीही) त्या न्यायालयांसमोर ई-फायलिंग केली जाऊ शकतात. ई-फायलिंगचा प्रारंभ झाल्याने भारतातील न्यायालयांसमोर न्यायप्रकरणे दाखल करण्याकरिता तांत्रिक उपाय योजला जाऊन कागद विरहित फायलिंग करण्याने वेळ आणि खर्च यांची बचत होणार आहे.