मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) विविध पदांवर तसेच राज्य क्रिकेट संघटनांवर सध्या भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व दिसून येत असून पक्षाच्या नेत्यांच्या मुलांची याठिकाणी वर्णी लावण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बीसीसीआयच्या पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलांनीदेखील विविध पदांवर ठाण मांडले असून भारतीय क्रिकेट प्रशासनाला घराणेशाहीने वेढले असल्याचे पाहायला मिळत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा सध्या बीसीसीआयचे सचिव असून भारतीय क्रिकेट प्रशासनात त्यांच्या शब्द अंतिम असे सध्याचे चित्र आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करून केंद्रीय विमान वाहतूक मंत्री झालेले ज्योतिरादित्य शिंदे यांचा मुलगा महानआर्यमन शिंदे याची ग्वाल्हेर क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून वर्णी लावण्यात आलेली आहे. क्रिकेट प्रशासनात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या धेंडांची मुले आता बीसीसीआयमधील विविध पदांवर आलेली आहेत.
बीसीसीआयच्या 38 सदस्यांच्या मंडळात बीसीसीआयच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या मुलांचा भरणा झालेला पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या आर. एम. लोढा समितीने 2016 मध्येच आदेश दिल्यानंतर बीसीसीआयची नवी घटना अस्तित्वात आली. त्यानुसार 70 वर्षावरील व्यक्तीला बीसीसीआयचे पदाधिकारी होता येत नाही तसेच त्यानंतरही बीसीसीआयमध्ये घराणेशाहीचा कारभार चालू आहे. सध्या बीसीसीआयच्या इतिहासात सर्वाधिक पदाधिकारी हे घराणेशाहीतून आलेले आहेत.
सहा वर्षे पदावर काम केल्यानंतर तीन वर्षे बाहेर थांबायचे अशा अटी असल्याने अनेक धनाढ्य आणि तालेवर पदाधिकाऱ्यांना बाहेर पडावे लागल्यावर लगेचच त्यांनी त्याठिकाणी आपल्या मुलांची वर्णी लावून घेतली आहे. काही राज्यांच्या क्रिकेट संघटना तर चार-पाच कुटुंबांच्याच हातात आहेत. विशेष म्हणजे गुजरातमध्येच घराणेशाही सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.
घराणेशाहीतून आलेले बीसीसीआयचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे –
- जय शहा – सचिव, बीसीसीआय – (वडील – केंद्रीय गृहमंत्री आणि गुजरात क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष)
- अरूण धुमल – खजिनदार, बीसीसीआय – (भाऊ- केंद्रीय माहिती, प्रसारण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर)
- महानआर्यमन शिंदे – अध्यक्ष, ग्वाल्हेर क्रिकेट संघटना, (वडील – ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष)
- धनराज नाथवानी – उपाध्यक्ष, गुजरात क्रिकेट असोसिएशन, (वडील- परिमल नाथवानी, गुजरात क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष
- प्रणव अमिन – अध्यक्ष, बडोदा क्रिकेट असोसिएशन – बीसीए (वडील – आयपीएलचे माजी हंगामी अध्यक्ष आणि बीसीएचे माजी अध्यक्ष
- अजित लेले – सचिव, बडोदा क्रिकेट असोसिएशन (वडील – स्व. जयवंत लेले, बीसीए आणि बीसीसीआयचे माजी सचिव)
- जयदेव शाह – अध्यक्ष, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. (वडील – निरंजन शाह, माजी सचिव सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय)
- अभिषेक दालमिया- अध्यक्ष, बंगाल क्रिकेट असोसिएशन, (वडील – स्व. जगमोहन दालमिया, माजी अध्यक्ष बीसीसीआय, आयसीसी आणि बंगाल क्रिकेट असोसिएशन)
- स्नेहाशिष गांगुली – मानद सचिव, बंगाल क्रिकेट असोसिएशन (भाऊ- सौरव गांगुली, अध्यक्ष बीसीसीआय)
- देवाशिष गांगुली – खजिनदार, बंगाल क्रिकेट असोसिएशन ( पुतण्या – सौरव गांगुली, अध्यक्ष – बीसीसीआय)
- रोहन जेटली – अध्यक्ष, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (वडील – स्व. अरुण जेटली, दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे
- माजी अध्यक्ष आणि आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलचे माजी सदस्य)
- अद्वैत मनोहर – अध्यक्ष, विदर्भ क्रिकेट असोसिएशन (वडील – शशांक मनोहर, माजी अध्यक्ष बीसीसीआय, व्हीसीए आणि आयसीसी)
- संजय बेहरा – सचिव, ओडिशा क्रिकेट असोसिएशन, (वडील – आशीर्वाद बेहरा, माजी सचिव, ओसीए)
- माहिम वर्मा – सचिव, उत्तराखंड क्रिकेट असोसिएशन (वडील – पी. सी. वर्मा, माजी सचिव सीयूए)
- विपुल फडके – सचिव, गोवा क्रिकेट असोसिएशन (वडील – विनोद फडके, माजी सचिव, जीसीए)
- निधीपती सिंघानिया – अध्यक्ष, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन (काका – स्व. यदुपती सिंघानिया, माजी अध्यक्ष, यूपीसीए)
घराणेशाहीतून आलेली ही सगळी मुले प्रत्यक्षात घटनेनुसार निवडून आल्याचे दिसत असले तरी ते फक्त कागदावर आहे. प्रत्येकाच्या वडिलांनी राज्यांच्या संघटनेत आणि इतरत्र स्वतःची शक्तीशाली चौकडी तयार करून ठेवलेली आहे. त्यामुळे राज्य संघटनांची सूत्रे सहजपणे त्यांच्या पुढच्या पिढीच्या हातात गेली आहेत.
वर्षानुवर्षे हे पदाधिकारी आणि चौकड्या राज्यातील जिल्ह्यांमधील नियुक्त्या करत असल्याने प्रत्येक जिल्ह्यातील मतदारांवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे बहुतेक राज्य संघटनांचे स्वरुप क्लबसारखे झाले आहे. बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला त्याठिकाणी प्रवेश करणे जवळपास अशक्य आहे, असे बीसीसीआयमधील एक ज्येष्ठ व्यक्तीचे म्हणणे आहे.