पिंपरी, दि. 27 (प्रतिनिधी) -पेट्रोल पंपावरील 12 लाख रुपयांची कॅश बॅंकेत जमा करण्यासाठी जात असेलल्या व्यक्तीवर दरोडा टाकून पळवण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव महिला पोलिसाने उधळून लावला. ही घटना सोमवारी (दि. 26) दुपारी सव्वा एक वाजता बॅंक ऑफ महाराष्ट्र, आकुर्डी येथे घडली. खाकीतील दुर्गा थेट दरोडेखोरावर धावली आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. दरोडेखोरांकडे पिस्तूलसह दरोड्याचे अन्य साहित्य आढळून आले आहे.
प्रमोद नामदेव चांदणे (वय 22), जयदीप मधुकर चव्हाण (वय 19), संतोष अभिमान चोथवे (वय 26, तिघे रा. मोरेवस्ती, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमोल राजाभाऊ चौधरी (वय 38, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकातील तुळजा भवानी मंदिराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
निगडी पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी सरस्वती काळे या सोमवारी दुपारी तुळजा भवानी मंदिराजवळ बंदोबस्तावर होत्या. फिर्यादी यांच्या पेट्रोल पंपावर जमा झालेली 11 लाख 95 हजार 970 रुपयांची रोकड ते बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकेत जमा करण्यासाठी जात होते. ते बॅंकेच्या पायऱ्या चढत असताना प्रमोद चांदणे याने अमोल यांना अडविले. त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. चोरट्याच्या हातात पिस्तूल पाहून तेथील इतरांची धावाधाव सुरू होऊन गोंधळ उडाला. हा प्रकार बंदोबस्तावरील सरस्वती काळे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी लगेच बॅंकेजवळ धाव घेतली. अमोल चौधरी आणि प्रमोद चांदणे यांच्यात झटापट सुरू असताना सरस्वती काळे यांनी नागरिकांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे तसेच दरोड्याचे अन्य साहित्य आढळून आले. जयदीप चव्हाण आणि प्रमोद चांदणे या दोघांनी हा दरोड्याचा प्रयत्न केला. प्रमोद याला संतोष चोथवे याने पिस्तूल दिले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना चार दिवसांची कोठडी
सुरुवातीला निगडी पोलिसांनी तिघांना अटक केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके करीत आहेत. आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या गुन्ह्यात चौथा आरोपी निष्पन्न झाला असून त्याला देखील अटक केली आहे. ताईतराव सुदाम कांबळे (वय 24, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) असे त्याचे नाव आहे. तो पूर्वी अमोल चौधरी काम करत असलेल्या पेट्रोलपंपावर काम करत होता. त्यामुळे त्याला पेट्रोल पंपावरील रोकड कोणत्यावेळी बॅकेत जमा करतात, याची माहिती होती.
पोलीस आयुक्तांकडून कौतुक
पोलीस अंमलदार सरस्वती काळे यांनी केलेल्या या कामगिरीबाबत पोलीस आयुक्तांनी देखील 10 हजार रुपये बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले. आरोपीकडे पिस्तूल होते तरी देखील न डगमगता काळे यांनी धाडसाने आरोपीकडून पिस्तूल काढून घेतले. याबाबत काळे यांचा निगडी पोलीस ठाण्यात देखील सन्मान करण्यात आला.