वडगाव मावळ, दि. 27 (प्रतिनिधी)- भात लागवडीकरिता प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यातील शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी आता उत्पन्नाची वेगळी वाट निवडू लागले आहेत. त्यांना कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळत असून, भोयरेतील 14 शेतकऱ्यांची महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम शेतीसाठी निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या या शेतकऱ्यांबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीम लागवड तंत्रज्ञान या विषयावरील कौशल्य आधारित प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रकल्प संचालक (आत्मा) पूनम खटावकर व तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली भोयरे ग्रामपंचायत कार्यालयात हे प्रशिक्षण पार पडले.
प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा रेशीम अधिकारी पी.जी.शिरसाट, विषय विशेषज्ज्ञ दत्तात्रय गावडे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे, मंडळ कृषी अधिकारी आर.पी.गायकवाड, कृषी सहाय्यक ए.आर पिरजादे व शेतकरी उपस्थित होते. जिल्हा रेशीम अधिकारी शिरसाट यांनी रेशीम शेतीबद्दल सविस्तर मार्गदर्शन करताना रेशीम शेतीचा इतिहास, गरज, महत्त्व याविषयी माहिती देऊन रेशीम शेतीसाठी तुती लागवड करताना जमीन तयार करण्यापासून ते लागवडीपर्यत सर्व बाबींची माहिती दिली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम उद्योगासाठी असणाऱ्या अनुदानाविषयी माहिती दिली.
त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राचे दत्तात्रय गावडे यांनी रेशीम शेतीमधील तुती वर येणाऱ्या विविध कीड व रोगांबद्दल सविस्तर माहिती देवून त्यावरील नियंत्रणासाठी विविध उपाय सांगितले. तसेच सध्याच्या भात पिकाच्या अवस्थेनुसार भातावर येणाऱ्या कीड व रोग याबद्दल माहिती देऊन नियंत्रणासाठी उपाय योजना सांगितल्या. यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे अधिकाऱ्यांनी समाधान केले. दिली. ए.आर. पिरजादे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राहुल घोगरे यांनी प्रस्ताविक केले. आर.पी.गायकवाड यांनी आभार मानले.
रेशीम उत्पादन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. पारंपरिक शेतीला हा सक्षम पर्याय उपलब्ध आहे. हळुहळू शेतकरी हा पर्याय स्विकारत आहेत. हा शेतकरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अतिशय उत्तम व्यवसाय असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. -दत्तात्रय पडवळ, कृषी अधिकारी