नवी दिल्ली – देश आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या तेजी दिसत असताना दुसरीकडे मासिक आधारावर ऑक्टोबर 2023 मध्ये देशातील बेरोजगारीचा (Unemployment) दर जवळपास 2.5 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. यामध्ये ग्रामीण भागात जास्त प्रमाण असून महिन्याच्या कालावधीत बेरोजगारीच्या दरात 4.62 टक्क्यांची (Unemployment rate increase) वाढ झाल्याचे पाहायला मिळते.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (CMI) ताज्या अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये राष्ट्रीयस्तरावर बेरोजगारीचा दर 10.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. मे 2021 नंतर बेरोजगारीच्या दराचा हा आकडा सर्वाधिक आहे. सप्टेंबर 2023 मध्ये हा दर 7.09 टक्के होता. गेल्या महिन्यात ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर झपाट्याने वाढून 10.82 टक्के झाला आहे. (Unemployment in India)
सप्टेंबरमध्ये ग्रामीण बेरोजगारीचा दर 6.2 टक्के होता. या कालावधीत शहरी बेरोजगारीत मात्र किरकोळ घट झाल्याचे पाहायला मिळते. हा दर आता 8.44 टक्के झाला आहे. सीएमआयईची ही आकडेवारी 1.70 लाखांहून अधिक कुटुंबांच्या मासिक सर्वेक्षणावर आधारित आहे.
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर विविध निर्देशांक भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे दर्शवित आहेत. 2023 आणि 2024 मध्ये जीडीपीची गती 6 टक्क्यांहून अधिक असेल, जी जगातील इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत सर्वात वेगवान आहे. तथापि, लाखो लोकांसाठी रोजगार निर्माण करण्याइतपत हा वेग अजूनही पुरेसा नाही. ऑक्टोबरमध्ये जवळपास एक कोटी लोकांनी काही काम मिळण्याच्या आशेने रोजगार केंद्रात नोंदणी केल्याचे या आकडेवारीतून दिसते. मात्र, सरकारने ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2022-23 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर 3.2 टक्के होता. तथापि, सरकार देशव्यापी आणि शहरी बेरोजगारीची आकडेवारी दर तिमाहीत एकदाच जाहीर करते.
ग्रामीण भागातील रोजगार कमी
गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मान्सून चांगला झाला नाही. याचा कृषी उत्पादनावर परिणाम झाल्याने ग्रामीण भागातील रोजगार कमी झाला आहे. तथापि, शहरी भागात उत्पादन आणि विक्री वाढल्याने आर्थिक उलाढाल तुलनेने मजबूत राहिली आहे. देशाच्या बऱ्याचशा भागात चांगला पाऊस झालेला नसला तरी, 2022-23 वर्षासाठी अन्नधान्य उत्पादनाचे लक्ष्य 328 दशलक्ष टन ठेवण्यात आले आहे, असे या अहवालात म्हटले आहे.