पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या बंगला आणि कार्यालयात एकदाच प्रवेश करण्यास बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने परवानगी दिली. त्यानंतर कुलकर्णी यांना शुक्रवारी (दि. १९) जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालय, तसेच सेनापती बापट रस्त्यावरील बंगल्यात प्रवेश देण्यात आला.
कुलकर्णी यांनी खटल्याच्या कामकाजासाठी काही कागदपत्रे, इलेक्ट्राॅनिक उपकरणे ताब्यात घेतली. न्यायालयाच्या आदेशाने ईडीच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून चित्रीकरण केले. त्यानंतर कुलकर्णी यांचा बंगला आणि कार्यालय पुन्हा सील करण्यात आले.
कुलकर्णी यांच्यासह ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी सकाळी जंगली महाराज रस्त्यावरील जंगली महाराज रस्त्यावरील डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात दाखल झाले. कुलकर्णी यांनी खटल्यासंदर्भातील कागदपत्रे आणि इलेक्ट्राॅनिक उपकरणे तेथून ताब्यात घेतली. ईडीच्या पथकाने कागदपत्रांचा पंचनामा केला. कागदपत्रांची नोंद करून याबाबतचा अहवाल तयार केला. या सर्व घटनेचे चित्रीकरण ईडीच्या पथकाने केले.
कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सेनापती बापट रस्त्यावरील “सप्तशृंगी’ बंगला, तसेच जंगली महाराज रस्त्यावरील डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे कार्यालय जप्त करण्यात आले. बंगला आणि कार्यालयात कागदपत्रे आणि इलेक्ट्राॅनिक उपकरणे आहेत.
खटल्याच्या कामकाजात माझी बाजू मांडण्यासाठी कागदपत्रे आणि उपकरणांचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे बंगला आणि कार्यालयात प्रवेश करण्यास तात्पुरती परवानगी मिळावी, असा अर्ज कुलकर्णी यांनी विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या न्यायालयात सादर केला होता.
ईडीने कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कुलकर्णी यांचे निवासस्थान आणि कार्यालय उघडावे. कुलकर्णी आणि कुटुंबीयांना प्रवेश देण्यात यावा. त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या खटल्यात आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करावीत.
या प्रक्रियेचा पंचनामा करून नोंद करावी. ईडी आणि कुलकर्णी यांनी आदेशाचा पूर्ततेचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा. ईडीचे अधिकारी आणि कुलकर्णी कुटुंबीय बंगला आणि कार्यालयात प्रवेश करताना, तसेच कागदपत्रे घेताना त्याचे चित्रीकरण करण्यात यावे. कागदपत्रे घेतल्यानंतर बंगला आणि कार्यालय पुन्हा बंद करण्यात यावे, असे न्यायालायने दिलेल्या आदेशात म्हटले होते.