नवी दिल्ली – राष्ट्रपती निवडणुकीतील केंद्रातील सत्तारूढ एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी गुरूवारी इतिहास घडवला. पहिल्या आदिवासी महिला म्हणून देशाच्या राष्ट्रपतिपदी विराजमान होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. आता 15 व्या राष्ट्रपती म्हणून 64 वर्षीय मुर्मू 25 जुलैला शपथ घेतील.
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलैला समाप्त होणार आहे. त्यांचा उत्तराधिकारी ठरवण्यासाठी 18 जुलैला निवडणूक झाली. त्या निवडणुकीसाठी 99 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. त्यानंतर गुरूवारी सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला. 10 तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या मतमोजणीनंतर मुर्मू यांच्या विजयाची औपचारिक घोषणा करण्यात आली.
राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार लोकसभा, राज्यसभेच्या खासदारांना आणि राज्यांच्या विधानसभा आमदारांना होता. त्यांच्या मतांचे एकूण मूल्य 10 लाख 86 हजार 431 इतके होते. त्यातील 6 लाख 76 हजार 803 मतमूल्य मुर्मू यांच्या वाट्याला गेले. तर, विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 3 लाख 80 हजार 177 मतमुल्यावर समाधान मानावे लागले.
एकूण 4 हजार 809 मतदारांपैकी 4 हजार 754 मतदारांची मते वैध ठरली. त्या मतदारांपैकी 2 हजार 824 जणांनी मुर्मू, तर 1 हजार 877 जणांनी सिन्हा यांना मतदान केले. मुर्मू यांना 540 खासदारांची, तर सिन्हा यांना 208 खासदारांची मते मिळाली. मुर्मू यांच्या वाट्याला आलेले मतमूल्य 64 टक्क्यांपेक्षा अधिक ठरले. त्या राष्ट्रपती बनण्याचा मान मिळवणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. त्याशिवाय, मुर्मू आतापर्यंतच्या सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती बनणार आहेत.