पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कॅनडातील टोरंटो येथील मराठी भाषिक मंडळ या सेवाभावी संस्थेतर्फे येत्या २१ एप्रिल रोजी ३६ वे मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांची बिनविरोध निवड झाली आहे.
टोरंटो येथील मराठी भाषिक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य चंद्रशेखर मराठे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. परदेशात असूनही गेली ५० वर्षे हे मंडळ कार्यान्वित असून, उत्तर अमेरिकेतील हे पहिले मराठी मंडळ आहे. याशिवाय मराठी शाळा गेल्या ५० वर्षांपासून चालविली जाते.
या संमेलनामध्ये काव्यवाचन, नाट्यवाचन, कथाकथन आणि साहित्यिक विषयांवरील भाषणे असे कार्यक्रम होतील. संमेलनाच्या शेवटी अध्यक्ष डॉ. उपाध्ये यांच्यासोबत मराठी भाषेतीची स्थिती- देशात-विदेशात या विषयावर गप्पा आणि प्रश्नोत्तरे होतील,
असे मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश रानडे आणि सचिव संग्राम पाटील यांनी सांगितले. संमेलनात डॉ. संजय उपाध्ये हे जिंकलो असे म्हणा या विषयावर अध्यक्षीय भाषण करतील.