पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील सूर्यदत्त सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज संस्थेला ‘रायझिंग भारत रिअल हिरोज २०२४’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उदयोन्मुख स्टार्टअप समूह आणि नावीन्यपूर्ण इंडस्ट्रीजच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत ग्राहकाभिमुख उत्पादने व सेवा पुरविण्याच्या सूर्यदत्तच्या कटिबद्धतेबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी व भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सूर्यदत्त सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ही उत्पादन, आयटी, ॲग्रो फूड्स, बायोटेक, आर्थिक व्यवस्थापन, डिजिटल सोल्यूशन्स, सेवा क्षेत्र आदी क्षेत्रांत कार्यरत आहे. ट्रेड अँड मीडिया ग्रुपतर्फे नुकतेच या सन्मान सोहळ्याचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, सूर्यदत्त सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा दृष्टिकोन हा एक जागतिक दर्जाचा व्यवसाय समूह बनून स्वावलंबनाद्वारे जीवन समृद्ध करणे, शाश्वत मूल्य निर्मितीद्वारे पायाभूत सुविधांच्या उभारणीत राष्ट्राला योगदान देणे आणि चांगुलपणासह वाढीचा समतोल राखणे आहे. पुणे, महाराष्ट्र येथे मुख्यालय असल्याने कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार, सरकारी धोरणानुसार आणि योग्य परिश्रम आणि बाजार संशोधनानंतर, भारतातील प्रमुख राज्यांसह जगभरात शाखा स्थापन करून व्यवसायात विविधता आणण्याची योजना आहे.