डॉ. अमित वाघ यांना 40 लाखांचा गंडा

  • आठ कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून उकळली मोठी रक्‍कम

पिंपरी – डॉक्‍टरांसाठी असलेल्या योजनेतून आठ कोटींचे कर्ज काढून देतो, असे सांगून एका डॉक्‍टरची 40 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना निगडीतील स्टार हॉस्पिटलमध्ये घडली.

डॉ. अमित अनंत वाघ (वय 36, रा. इमिरेट हिल, सोमाटणे फाटा, तळेगाव) यांनी शुक्रवारी (दि. 31) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन पवार (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही. मोबाईल क्रमांक 8806449434) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 जून ते 27 जुलै 2020 या कालावधीत स्टार हॉस्पिटल, निगडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अमित वाघ यांच्या मोबाइलवर रोहन पवार नावाच्या व्यक्तीने फोन करून मी स्टॅण्डर्ड चार्टड बॅंक कल्याणीनगर शाखा पुणे येथून बोलत आहे, असे सांगितले.

डॉक्‍टरांसाठी आमची कर्ज योजना आहे. तुम्हाला पैशांची गरज आहे का? अशी विचारणा डॉ. वाघ यांच्याकडे केली. यानंतर फिर्यादी डॉ. वाघ यांचा विश्वास संपादन करून सर्व केवायसी कागदपत्रे त्याने डॉक्‍टरांकडून घेतली. त्यानंतर आठ कोटी रुपयांचे तुम्हाला कर्ज काढून देतो, असे सांगितले. एवढेच नाहीतर आठ कोटी कर्ज मंजूर झाल्याचे बॅंकेचे बनावट मंजुरी पत्र देखील तयार करून डॉक्‍टरांना दिले. त्याबदल्यात त्याने डॉक्‍टरांकडून रोख 40 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.

दरम्यान, फिर्यादी डॉक्‍टर वाघ यांना त्यांच्या रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी अत्यावश्‍यक असलेले व्हेंटिलेटरसह इतर साहित्य घ्यायचे असल्याने त्यांना पैशाची आवश्‍यकता होती व यासाठी त्यांना कर्ज हवे होते, त्यातूनच त्यांची फसवणूक झाली, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.