स्त्रित्वाच्या संवेदनांचा मुक्‍त आवाज डोरिस लेसिंग

डोरिस लेसिंग यांचं लेखन अनेक अर्थांनी वेगळं आहे. स्त्री म्हणून लहानपणापासून आलेल्या कटू अनुभवांचं संचित त्या मांडतात पण हात आखडता न घेता. दगड नि खाचखळग्यांतूनही झरा जसा मुक्‍त वाहत जातो, तशी त्यांची लेखणी पाझरत जाते…
डोरिस लेसिंग यांचा जन्म पर्शियात (सध्याचा इराण) 22 ऑक्‍टोबर 1919 मध्ये झाला. त्यांचे वडील इम्पिरियल बॅंक ऑफ पर्शियात कामाला होते तर आई नर्स होती. वडिलांच्या निधनानंतर आईसोबत डोरिस दक्षिण ऱ्होडेशिया (सध्याचा झिम्बाब्वे) इथं स्थायिक झाल्या. डोरिस यांनी त्यांच्या बालपणाचं वर्णन “चिमूटभर आनंद आणि आभाळभर दुःखाने भरलेलं’ असं केलंय. आईनं त्यांना अत्यंत कडक शिस्तीत वाढवलं. पण “वेदनादायी बालपण लेखकांना जन्म देतं,’ असं डोरिस यांनीच केलेलं वर्णन त्यांच्यातल्या सकारात्मकतेचं दर्शन घडवतं.

डोरिस यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी नर्सची नोकरी पत्करली आणि पहिल्यांदा घरातून बाहेर पडल्या. दवाखान्याचे मालक त्यांना पुस्तकं द्यायचे आणि त्यांचे एक नातेवाईक त्यांना चुंबन द्यायचे. अर्धे कच्च्या वयातल्या या घटनेमुळे त्यांची प्रेमानुभूती अर्धवट राहिली. त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या लेखनात दिसून येतं.
“द ग्रास इज सिंगिंग’ ही त्यांची पहिली कादंबरी 1949 मध्ये प्रसिद्ध झाली. तीच त्यांच्या लेखकीय कारकिर्दीची सुरुवात.
द गोल्डन नोटबुक (1962), ब्रिफिंग फॉर अ डिसेंट इनटू हेल (1971), मेमॉयर्स ऑफ अ सर्व्हायवर (1974), द डायरी ऑफ अ गुड नेबर (1983), द गुड टेररिस्ट (1985), द फिफ्थ चाईल्ड (1988) ही त्यांच्या पन्नास पुस्तकांपैकी काहींची शीर्षकं. त्यांनी “अंडर माय स्कीन’ या शीर्षकाचं आत्मचरित्रंही लिहिलं. या आत्मचरित्राच्या पहिल्या खंडाला

सर्वोत्तम आत्मचरित्रासाठीचं “जेम्स टेट ब्लॅक’ पारितोषिक मिळालं. 2001 मध्ये प्रिन्स अस्टुरियस पारितोषिक, त्यानंतर डेव्हिड कोहेन ब्रिटिश साहित्य पारितोषिकही त्यांना देण्यात आलं. 2005 मध्ये बुकर पारितोषिकाच्या लघुयादीसाठी त्यांचं नामांकन झालं होतं.
डोरिस लेसिंग यांची “लव्ह, अगेन’ ही वृद्धावस्थेतल्या स्त्रीची प्रेमकहाणी आहे. दुसऱ्या देशात राहणाऱ्या आणि प्रेमात पडल्यानंतर प्रेम आणि प्रतिष्ठा यांच्यात दोलायमान स्त्रीची मनोभावना ही कादंबरी व्यक्‍त करते.

सारा ही अनेक वर्षांचं विधवा जीवन, चांगली वयात आलेली मुलं या स्थितीत जगणारी लेखिका. बिल या एका अत्यंत देखण्या विशीतल्या तरुण नटाच्या प्रेमात ती पडते. त्यानंतर ती तिशीतल्या हेन्री या दिग्दर्शकाच्याही प्रेमात पडते.

ज्युली वेरॉन या एका फ्रेंच उन्मुक्‍त मुलीच्या लेखनावर आधारित नाटक बसवण्यात हे तिघंही मशगुल असतात. ज्युली ही तिच्या प्रियकराचा शोध घेत फ्रान्समध्ये पोहोचते, त्याचा शोध घेते आणि 1912 मध्ये तिचा मृत्यू होतो. 1912 हा काळ पहिलं महायुद्ध सुरू होण्याच्या अगदी आधीचा आहे. या महायुद्धानं महिलांचं जीवन आमूलाग्र बदलून टाकलं हे इथं विशेष नमूद केलं पाहिजे.

सारा आणि ज्युली यांच्या स्वभाव आणि व्यक्‍तिमत्वातली अनेक साम्यस्थळं अधोरेखित करत लेखिकेनं चांगली पार्श्‍वभूमी तयार केली आहे. लेखिकेच्या जीवनावरची कादंबरी, त्या कादंबरीत एक नाटक आणि ते नाटक ज्यावर आधारित आहे असं साहित्य लिहिणारी लेखिका ही गुंतागुंत साराच्या मनातला गुंता व्यक्‍त करते. बराच काळापर्यंत अनुभवलेल्या विधवा जीवनानंतर आपल्या जवळचं कोणीतरी असावं, ही तिच्या मनात बळावलेली भावना, पुरुषांशी संबंध ठेवूनही न भरलेली शारीरिक-मानसिक पोकळी या सगळ्याचं चित्रण करण्यासाठी कादंबरीतल्या या नाटकात नेपथ्य-संगीत याचा वापर केला जातो, याचं वर्णनही कादंबरीत सुंदररित्या केलंय. बिल हा नट आणि हेन्री हा दिग्दर्शक या दोघांच्या प्रेमात पडल्यानंतर सारामध्ये होणाऱ्या बदलाचं वर्णनही सुरेखच. वृद्धापकाळात स्त्रीला असणारी पुरुषाची गरज, त्याचं मानस-भावनिक पातळीवर केलेलं विश्‍लेषण याचा उत्तम नमुना म्हणजे ही कादंबरी.

आत्मनिवेदनात्मक कथनशैली, स्वानुभवांचं वर्णन करणारी लेखणी, राजकीय-सामाजिक चिंतनातून प्रसवणारे शब्द ही डोरिस यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. भिन्न संस्कृतींमधला संघर्ष, वांशिक असमानतेच्या पार्श्‍वभूमीवर होणारा घाऊक अन्याय आणि स्वतःच्या व्यक्‍तिमत्त्वातल्या विरोधात्मक घटकांशी होणारा
स्वतःचा संघर्ष याचं चित्रण डोरिस यांच्या लेखनातून दिसतं. व्यक्‍तिगत चिंता-आकांक्षा-द्वंद्व आणि सार्वजनिक चांगुलपणा यांच्यादरम्यानचा विरोधाभासही डोरिस यांनी उत्तमरीत्या कागदावर उतरवला आहे. डोरिस यांनी राजकीय-सामाजिक मुद्द्यांवर विविध आंदोलनांतही सक्रिय सहभाग घेतला. अण्वस्त्रांच्या विरोधातल्या आंदोलनातही त्यांनी हिरीरीनं सहभाग घेतला.

लहानपणापासून मनावर उमटलेले नाकारलेपणाचे ओरखडे, घर-संसाराबद्दलची ओढ, प्रेम, दुःख, नैराश्‍य अशा कितीतरी भावना डोरिस यांनी खूप समर्थपणे चितारल्यात. डोरिस या आतापर्यंतच्या नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या सर्वांत वृद्ध लेखिका आहेत. तोवरच्या जीवन प्रवासातले अनुभव, भावविश्‍व आणि मानसिक प्रगल्भता त्यांच्या लेखणीतून सहज-सरलपणे प्रसवताना दिसतं. डोरिस लेसिंग यांना 2007 मध्ये वयाच्या 88 व्या वर्षी साहित्यासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले. स्त्रियांच्या अनुभवाची महान लेखिका, जिने चिकित्सा, अंतःप्रेरणा आणि दूरदृष्टीच्या शक्‍तीद्वारे विभाजित संस्कृतींची फेरतपासणी केली,’ अशा शब्दांत नोबेल पारितोषिक समितीनं डोरिस यांचा गौरव केलाय.

डोरिस यांनी नोबेल पारितोषिक स्वीकारताना “नॉट विनिंग द नोबेल प्राइझ’ या विषयावर व्याख्यान दिलं. जगातली संधींची असमानता याकडे लक्ष वेधत ही परिस्थिती बदलण्यासाठी लेखकांनी पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्‍त केली. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, “आपल्या कल्पनाच आपल्याला घडवतात, जिवंत ठेवतात, सृजनशक्‍ती देतात. आपण कोसळतो, जखमी होतो किंवा उद्‌ध्वस्त होतो तेव्हा आपलं लेखनच आपल्याला पुन्हा ताकदीनं उभं राहण्याची शक्‍ती देतं.’ यातून त्यांचा साहित्य आणि मानवी अस्तित्वाकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन स्पष्ट होतो. नोबेल पारितोषिकानं सन्मानित केलेल्या आतापर्यंतच्या सर्वांत वयोवृद्ध साहित्यिकाचा मान मिळवणाऱ्या या विदुषीची साहित्ययात्रा 17 नोव्हेंबर, 2013 ला (वय 94 वर्षे) संपली.

-डॉ. भालचंद्र सुपेकर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.