नवी दिल्ली – करोना संसर्गाची तिसरा लाट देशात येणार असल्याच्या शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. मात्र करोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरेल असंही अनेकांनी म्हटलं आहे. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र सिरमने लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात गुड न्यूज दिली आहे.
कोवोव्हॅक्स (Covovax) लशीची लवकरच लहान मुलांवर चाचणी केली जाणार असल्याचं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) स्पष्ट केलं आहे. त्यासाठी कंपनी लवकरच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) या नियामक संस्थेकडे परवानगीसाठी अर्ज करणार असल्याची शक्यता आहे.
18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींवर लशी घेतल्या जात असलेल्या चाचणीचा तिसरा टप्पा 18 जूनपासून सुरू झाला आहे. नोव्हाव्हॅक्स कंपनी सिरम इन्स्टिट्यूटसह लस उत्पादन करणार असल्याचं सप्टेंबर 2020मध्ये जाहीर केलं होतं. या दोन्ही कंपन्यांनी मिळून विकसित केलेली कोवोवॅक्स लस आहे.
अदर पुनावाला ट्विट करून म्हणाले की, पुण्यातील आपल्या प्लांटमधून या आठवड्यात नोव्हाव्हॅक्सच्या मदतीने कोवोव्हॅक्सच्या पहिल्या बॅचची निर्मिती पाहण्यासाठी उत्सुक आहे. या लसीत १८ वर्षांखालील मुलांचा करोनापासून बचाव कऱण्याची क्षमता आहे. या लसीच्या चाचण्या लवकरच सुरू होणार असून ‘वेल डन सिरम’, असंही पुनावाला यांनी म्हटलं.
Excited to witness the first batch of Covovax (developed by @Novavax) being manufactured this week at our facility in Pune. The vaccine has great potential to protect our future generations below the age of 18. Trials are ongoing. Well done team @seruminstindia! pic.twitter.com/K4YzY6o73A
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) June 25, 2021
मिळालेल्या वृत्तानुसार सिरमकडून सुरुवातीला 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर लशीची चाचणी घेतली जाईल. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर चाचणी घेण्यात येईल.