जागतिक वृद्ध दिनानिमित्त निलेश महाराज कोरडे यांचा सल्ला
ओझर -आपण वृद्ध झालोय याची खंत न बाळगता जीवन जगत असताना आपण भूतकाळात डोकावून पहा व येणाऱ्या संकटाशी दोन हात करण्यास सज्ज व्हा. वृद्धत्वाचे जोडे दूर सारून जगण्यात बेधुंदपणा आणा व उर्वरित आयुष्य आनंदात जगा. भाऊबंदकीचा राग सोडून एकत्र कुटुंबव्यवस्थेत जीवन जगा कुटुंबात सुसंवाद साधा, त्याचबरोबर या व्यवस्थेस योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करा. वार्धक्याकडे झुकल्यावर प्रत्येकाने स्वार्थी जीवन जगण्यावर भर दिला पाहिजे जेणेकरून वृद्धापकाळात आपल्याला कोणाकडे हात पसरावयाला लागू नये, असे प्रतिपादन हभप निलेश महाराज कोरडे यांनी केले.
जागतिक वृद्ध दिनानिमित्त श्री मळगंगा जेष्ठ नागरिक संघ व ग्रामस्थ धोलवड यांच्या संयुक्त विद्यमाने धोलवड (ता. जुन्नर) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात निरामय वार्धक्य विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. वृद्धापकाळात घरातील ज्येष्ठांवर कुठलीही बंधन नसतात. त्यातच एकत्र कुटुंब व्यवस्था नसल्याने व वृद्ध व्यक्ती परावलंबी झाल्याने वृद्ध व्यक्तींकडे लक्ष देण्यास आजच्या धावपळीच्या युगात घरातील लोकांना वेळ नसतो परिणामी वृद्धांची रवानगी नाइलाजास्तव वृद्धाश्रमात केली जाते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी सुनेला मुलीप्रमाणे वागणूक द्या, म्हणजे घराचे नंदनवन होईल. आपल्या नातवंडाना योग्य संस्कार करा जेणेकरून येणारी भावी पिढी सुंदर व समाजाभिमुख घडेल.
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धोलवड ग्रामविकास ट्रस्टचे अध्यक्ष अशोक मुंढे, मळगंगा उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डी. डी. नलावडे, उपाध्यक्ष साहेबराव नलावडे, सरपंच मंगल नलावडे, पौर्णिमा भोर, भोलेनाथ नलावडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मुरलीधर मुंढे, पोपटराव टेमगिरे, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कर्पे, तर साहेबराव नलावडे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.