मंचर- सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या मंचर येथील श्री साईनाथ सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेला यावर्षी एक कोटी रुपये निव्वळ नफा झाला असून, सभासदांना 15 टक्के लाभांश वाटपाचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती साईनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष गिरीश कुमारपालजी समदडिया यांनी दिली.
मंचर येथे साईनाथ पतसंस्थेच्या झालेल्या वार्षिक सभेत समदडिया बोलत होते. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र गावडे, संचालक युवराज बाणखेले, संजय चव्हाण, नरेंद्र धुमाळ, राजेंद्र सोमवंशी, प्रिया बाणखेले, सगाजी पाटील, मंदा बाणखेले, राजेंद्र थोरात यांच्यासह सभासद उपस्थित होते. लोकसेवा सहकारी बॅंकेकडे 14 कोटी रुपयांची ठेव ठेवली होती. या बॅंकेकडून व्याजासह 18 कोटी 47 लाख रुपये पतसंस्थेकडे जमा झाले असल्याची माहिती समदडिया यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत जे. के. थोरात, राजू इनामदार, भानुदास उर्फ दत्ता माशेरे, भास्कर लोंढे, मनोहर कंधारे, नारायण प्रभु निघोट, वसंत बाणखेले यांनी भाग घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शर्मा यांनी अहवाल वाचन केले.