कॅंडी :- आशिया करंडक तसेच त्यानंतर होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या विराट कोहली विरुद्ध यशस्वी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा माजी आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज मखाया एन्टीनीने सर्वच गोलंदाजांना एक सल्ला दिला आहे. कोहलीला लवकर बाद करायचे असेल तर त्याच्या विरुद्ध स्लेजिंग करू नका, त्याला जितका शांत ठेवता येईल तेवढा ठेवा तो स्वतःच चूक करेल, असे एन्टीनीने म्हटले आहे.
आजवर कोहलीची फलंदाजी मी अनेकदा पाहिली आहे. त्याला स्लेजिंग करून त्याची खोडी काढण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रत्येक वेळी त्याने चोख प्रत्युत्तर देताना मोठी खेळी केली आहे. याउलट त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिले तर तो स्वतःच आत्मघातकी फटका खेळून बाद होतो. ते फलंदाजी करत असताना कोहलीला डिवचू नका, त्याला बाद करण्याचा हाच एक मार्ग आहे, असेही एन्टीनी म्हणाला.
कोहलीशी मैत्री असलेल्या गोलंदाजने स्लेजिंग केले तर तो ते फारसे मनावर घेत नाही. मात्र, अन्य कोणत्या गोलंदाजाने त्याला डिवचले तर तो त्याच्या मागे हात धुवून लागतो व त्याच्याच गोलंदाजीला लक्ष्य करतो. जेव्हा त्याला लक्षात येते की गोलंदाज त्याच्या विरुद्ध स्लेजिंग करत नाहीत, तेव्हा तो खूप कंटाळतो व चुका करून बाद होतो हे मी अनेकदा पाहिले आहे, असेही त्याने म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून खूप अपेक्षा..
भारतात यंदा होत असलेली विश्वकरंडक स्पर्धा यजमान म्हणून भारतीय संघाला जिंकण्याची जास्त संधी आहे. मात्र, उपांत्य फेरीत भारतासह पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया हे चार संघ निश्चित होतील असा मला विश्वास आहे. दक्षिण आफ्रिकेकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांना आजवर जे जमले नाही ते त्यांनी यंदाच्या स्पर्धेत करून दाखवावे व विजेतेपद मिळवावे, अशी अपेक्षाही एन्टीनीने व्यक्त केली आहे.