कोयनानगर – कोयनानगर येथे दोन गटात वर्चस्ववादावरून कोयना पोलीसांसमोर राडा झाला. याप्रकरणी कोयना पोलीसांनी दोन्ही गटातील 11 जणांवर जमावबंदी व शस्त्रबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अवैध धंद्यांतील स्पर्धा व वर्चस्ववाद चव्हाटयावर आल्यामुळे हा राडा झाला असून या घटनेमुळे शांत असणारे कोयनानगर अशांत होऊ लागले असल्याचे चित्र आहे.
कोयनानगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोयनानगर येथील जुने मार्केट परिसरात दोन गटांत सूरू असलेल्या बाचाबाचीचे पर्यावसन तुंबळ मारामारीत झाले. हेळवाक गावातील संदीप चव्हाण, बापू चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, पांडुरंग कदम, मंगेश पवार, राहुल चव्हाण, तर दुसऱ्या गटातील मुस्तफा कुरेशी, मतीन खाटीक, हुमायुन कलाल, बाळा शिंदे व माने (सर्व रा. कोयनानगर) यांनी बेकायदा जमाव जमवून पोलीसांसमोर एकमेकांना शिवीगाळ करत दांडक्याने मारहाण केली.
पोलीसांसमोर बेकायदेशीररित्या जमाव जमवून शिवीगाळ व दांडक्याने मारहाण करुन जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड तपास करत आहेत. दरम्यान, अवैध धंद्यांच्या वर्चस्ववादावरून हा वाद झाला आहे. पोलीसांनीही तक्रारीत वर्चस्व स्थापित होण्यासाठी दोन गटात हा वाद झाला असल्याचे नमूद केले आहे.