मुंबई – किल्ले प्रतापगड येथे शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. शिवप्रतापदिनासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे उदयनराजे भोसले यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितलं जात आहे. अश्यातच, आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील याच गोष्टीचा आधार घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केला आहे.
संजय राऊत म्हणाले, ‘तिकडे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते त्यांनी शिवरायांच्या अपमान करून ते त्यांच्या जागेवरती बसलेले आहेत, तुम्ही त्यांचं समर्थन करत आहात. अशा मुख्यमंत्र्यांना गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत पुढे म्हणाले, “हा जल्लोष जो आहे… तो जल्लोष महाराष्ट्रात नेहमी होतो. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही महत्त्वांच्या दिवशी. शिवप्रताप दिनाचं महत्त्व समजून घ्या, जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर आपण राज्यपालांचा धिक्कार केला असता किंवा राज्यपालांना परत पाठवण्याची मागणी केली असती, तर आजच्या शिवप्रताप दिनाचं महत्त्व हे अधिक वाढलं असतं. असं सुद्धा ते म्हणाले.
शिवप्रताप दिन कार्यक्रमाला उदयनराजे प्रतापगडावर उपस्थित राहणार नाहीत…
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे उदयनराजे नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी किल्ले प्रतापगडावरील कार्यक्रमांना न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, उदयनराजे यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले या देखील प्रतापगडावरील कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत.